भुलेश्वर येथून हवाला ऑपरेटर अंगडियाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 19:59 IST2018-06-29T19:59:20+5:302018-06-29T19:59:32+5:30
भुलेश्वर येथील एका हवाला ऑपरेटर असलेल्या अंगाडियाला बुधवारी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली.

भुलेश्वर येथून हवाला ऑपरेटर अंगडियाला बेड्या
मुंबई - भुलेश्वर येथील एका हवाला ऑपरेटर असलेल्या अंगाडियाला बुधवारी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. हरिश शामलाल ग्यानचंदानी असे या अंगाडियाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या सिमकार्डसह पाच मोबाईल फोन, सुमारे 93 लाख रुपयांची रोकड आणि हिशोबाची एक डायरी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्याच आठवड्यात रामदास रहाणे याला खंडणीच्या एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. रामदास हा दाऊदचा अत्यंत जवळचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जातो. त्याने एका हॉटेल व्यावसायिकाला 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. मात्र,हा व्यावसायिक खंडणी देण्यास तयार नसल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि खंडणीकरीत धमकी येत असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याला पोलीस संरक्षण देखील पुरविण्यात आले होते. रहाणेच्या पोलीस चौकशीत अधिक माहिती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने अंगडिया शामलाल ग्यानचंदानीला बेड्या ठोकल्या. ग्यानचंदानीची देखील पोलीस चौकशी सुरु असून याप्रकरणी अजून अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.