विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ काढले का?; शासनाने दिली ३१ जानेवारी अंतिम मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:52 IST2026-01-20T14:51:51+5:302026-01-20T14:52:46+5:30
मुंबईतील अडीच लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार परिणाम; शिक्षणतज्ज्ञांचे मत

विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ काढले का?; शासनाने दिली ३१ जानेवारी अंतिम मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थ्यांचे ‘अपार’ ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. मुंबईत अडीच लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनी अपार आयडी करिता अर्ज नोंदणी केलेली नाही. आतापर्यंत १५ लाख ६४ हजार ८७१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट झाले आहेत. ठरलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात येत आहे.
अनेक तांत्रिक अडथळे
आधार कार्ड व शालेय नोंदीदरम्यान नावात तफावत, पालकांची माहिती अपूर्ण असणे, तसेच तांत्रिक अडथळे या प्रमुख अडचणी येतात.
आयडीसाठी सक्ती नाही
शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून अपार आयडी तयार करता येतो. अपार आयडीसाठी पालकांचे संमती पत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. मात्र, शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही.
अपार आयडीमुळे स्वतःचे प्रमाणपत्र केव्हाही कुठेही डाउनलोड करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी अपार आयडीसाठी अर्ज नोंदणी करण्याचा सूचना दिल्या आहेत.
-संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, शिक्षण विभाग