Join us  

'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:49 PM

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत.

मुंबई: राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत ११ जुलैपासून प्रसिद्ध होईल, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत शनिवारपासून (११ जुलै) प्रसिद्ध होईल, ही मुलाखत आतापर्यंतची सर्वात वेगळी असेल. शरद पवार यांचं ज्ञानाचं भांडार लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आज देशात शरद पवांरासारखा ताकदीचा नेता दुसरा नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, लोकांनी पाहिलेले शरद पवार वेगळे अन् मी पाहिलेले वेगळे आहेत. त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले. मी महाविकास आघाडीचं सरकार बनवताना शरद पवारांची ठाम भूमिका बघितली, असं संजय राऊत यांनी सांगितले.

"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"

महाविकास आघाडीच्या नेतृत्वात कोणतेही मतभेद नाहीत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत, त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असं देखील संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार हे चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींबाबत जोरदार बोलल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन दिवसांत अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यातच पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी बारामती गाठत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे देखील ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पवारांकडे पारनेरचे नगरसेवक परत द्या, असे सांगितल्याचे समजते. या सगळ्या राजकारणावरून ठाकरे सरकार पडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. नेमक्या याच वेळी संजय राऊतांनी पवारांच्या मुलाखत घेतल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

टॅग्स :शरद पवारसंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी