Join us
Daily Top 2Weekly Top 5

मविआत बिघाडी? राज्यसभेसाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा; पत्रकार परिषदेत उद्धवसेना गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:28 IST

Congress Harshwardhan Sapkal News: राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे.

Congress Harshwardhan Sapkal News: राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेरच्या क्षणापर्यंत कायम असल्याचे पाहायला मिळाले. वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या हायकमांडने पाठिंबा दिला. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. या पत्रकार परिषदेला उद्धवसेनेकडून कोणीही नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय

या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची अपेक्षा होती पण राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे दोन चर्चा सविस्तर चर्चा झाली. जयंत पाटील हेही तेव्हा उपस्थित होते, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : MVA rift? Congress supports Pawar for Rajya Sabha; Uddhav Sena absent.

Web Summary : Congress supports Sharad Pawar for Rajya Sabha amid MVA tensions. Uddhav Sena's absence from the press conference sparks political buzz. Discussions occurred with Thackeray.
टॅग्स :राज्यसभाहर्षवर्धन सपकाळकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळेशरद पवार