मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांकडून उमटली आहे. आधीच दोन वर्षे कठोर अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर आता पुन्हा तयारी करावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तसेच अनेकांनी परदेशी आणि बाहेरगावी जाण्याचे बेत आखले होते. आता त्यांना हे बेत सोडून पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यातून यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
मुलीने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून गेले दोन वर्षे अथक परिश्रम घेतले होते. आता ही परीक्षा संपल्यामुळे काहीसा तणाव दूर करण्यासाठी आम्ही परदेशात फिरायला जाणार होतो. त्यासाठी विमान तिकिटे आणि परदेशातील हॉटेलांचे बुकिंग केले होते.
आता पुन्हा परीक्षा होणार असल्याने हा बेत रद्द करावा लागणार आहे. आम्ही नॉन रिफंडेबल तिकीट बुक केले होते. त्यामुळे प्रवासाचे पैसे मिळणार नाही. हॉटेल बुकिंगचेही काही पैसे मिळणार नाहीत. जवळपास ७ लाख ते ८ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे, अशी माहिती पालक राहुल राजगढिया यांनी दिली.
नीटची परीक्षा ऑनलाइन घ्यावी
मुंबई : नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीनंतर आता ही परीक्षा घेण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका जयपूर येथील प्रिंटिंग प्रेसमधूनच परीक्षेच्या काही दिवस आधीच फुटल्याने, आता ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली जात आहे, तसेच नीटसह अन्य सर्वच परीक्षांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून देशपातळीवर सरकारी डेडिकेटेड परीक्षा केंद्रे उभारावीत, अशी मागणी पुढे आली आहे.
आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली जेईई, तसेच राज्य सरकारमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटीची शक्यता नगण्य असते. त्याच धर्तीवर नीट यूजी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी पुढे आली आहे.
सद्यस्थितीत नीट यूजी परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. त्यासाठी प्रश्नपत्रिका केंद्रीय स्तरावर परीक्षेच्या काही दिवस आधीच छापल्या जातात, तसेच या प्रश्नपत्रिका देशपातळीवर पाठविल्या जातात. या प्रवासात प्रश्नपत्रिका फुटण्याची भीती असते, तसेच खासगी परीक्षा केंद्रांवर काही गैरप्रकार घडू नये, यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून डेडिकेटेड परीक्षा केंद्र उभारण्याची मागणी समुपदेशक सचिन बांगड यांनी केली आहे.
मला आधीचा पेपर सोपा गेला होता. या परीक्षेत ७२० पैकी ६८८ गुण मिळण्याची अपेक्षा होती. गेले सहा महिने १५ तास अभ्यास करून परीक्षा दिली होती. हे सर्व प्रयत्न वाया गेले. दोन वर्षांनंतर आता मोठ्या सुट्यांसाठी बाहेर जात होतो. आता त्याचाही आनंद घेता येणार नाही.
-परिधी राजगढिया, विद्यार्थिनी
परीक्षेत गैरप्रकारांच्या संशयामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि भवितव्य लक्षात घेऊन अधिक जबाबदारीने निर्णय घ्यावा.
-डॉ. माधव सूर्यवंशी, मुख्य समन्वयक, शिक्षण विकास मंच
Web Summary : NEET exam cancellation triggered anger among students and parents. Re-preparation causes mental stress. Travel plans are ruined, incurring financial losses. Calls for online exams and dedicated centers grow to prevent future leaks.
Web Summary : नीट परीक्षा रद्द होने से छात्र और अभिभावक आक्रोशित हैं। पुन: तैयारी से मानसिक तनाव बढ़ गया है। यात्रा योजनाएँ रद्द होने से आर्थिक नुकसान हुआ है। भविष्य में लीक रोकने के लिए ऑनलाइन परीक्षा और समर्पित केंद्रों की मांग उठी।