Happy Birthday ... Disarch today by beating Corona, will hit a century tomorrow in mumbai | Video : हॅप्पी बर्थ डे...  कोरोनावर मात करुन आज डिस्चार्ज, आजोबांची उद्या शतकपूर्ती

Video : हॅप्पी बर्थ डे...  कोरोनावर मात करुन आज डिस्चार्ज, आजोबांची उद्या शतकपूर्ती

मुंबई - वयाची शंभरी पार करण्यासाठी अवघे दोन आठवडे असताना आजोबांना कोरोनाची लागण झाली. आणि शतकपूर्ती सोहळ्याच्या तयारीला लागलेल्या कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. आजोबांना तात्काळ जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जिथे कोरोनाच्या भीतीने तरुण रुग्णही गर्भगळीत होत असताना आजोबांनी कमालीचे धैर्य दाखवत कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयातच आजोबांचा वाढदिवस साजरा करीत त्यांना डिस्चार्ज दिला.

पूर्वीच्या देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवाशी असलेले अर्जुन नारिंग्रेकर यांचा जन्म १५ जुलै १९२० रोजी झाला आहे. सध्या ते कांदिवली येथे आपल्या मुलाच्या घरी राहतात. यावर्षी १५ जुलै रोजी ते वयाची शंभरी ओलांडून १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या घरातील काही सदस्यांना व त्यानंतर आजोबांनाही १ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली. पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना निमोनिया झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आजोबांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. 

मात्र त्यांचे वय लक्षात घेता ते औषधाला कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता होती. परंतु, मुळातच शिक्षक असणा-या आजोबांनी आपली जिद्द सोडली नाही. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळणारे योग्य उपचार, जेवणाच्या आणि औषधाच्‍या वेळा काटेकोरपणे पाळत आजोबा कोरोनामुक्त झाले. त्यांना मंगळवारी डिस्‍चार्ज देताना रुग्‍णालयातील कर्मचा-यांनी आवर्जून केक आणून आजोबांचा वाढदिवस साजरा केला. नारिंग्रेकर आजोबांनीही रुग्‍णालयातील सर्वच डॉक्‍टर आणि कर्मचा-यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Happy Birthday ... Disarch today by beating Corona, will hit a century tomorrow in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.