Maharashtra Politics: “आम्हाला दोषमुक्त करा”; राणा दाम्पत्याचा कोर्टात अर्ज, भूमिका स्पष्ट करण्याचे पोलिसांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:01 IST2023-01-10T14:59:04+5:302023-01-10T15:01:04+5:30
Maharashtra News: मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Maharashtra Politics: “आम्हाला दोषमुक्त करा”; राणा दाम्पत्याचा कोर्टात अर्ज, भूमिका स्पष्ट करण्याचे पोलिसांना आदेश
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार अपक्ष खासदार नवनीत राणा (mp navneet rana) आणि अपक्ष आमदार रवी राणा (mla ravi rana) यांनी केला होता. त्यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी आता दोषमुक्त करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्य जामिनावर आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात झाली. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वाद प्रकरणातून दोषमुक्त करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, आमदार रवी राणा यांनी विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर पोलिसांना २ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
राणा दाम्पत्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे
याप्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दोघांतर्फे प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना राणा दाम्पत्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे वारंवार आदेश देऊनही राणा दाम्पत्य सुनावणीला अनुपस्थित न राहिल्याने विशेष न्यायालयाने तिसऱ्यांदा दोघांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य न्यायालयात उपस्थित झाले. त्यानंतर न्यायालयाने वॉरंट रद्द केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"