Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गारांचा मारा, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ; वीज पडून चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 06:55 IST

आज पुन्हा १२ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून, सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पाऊस झाला. अहिल्यानगरसह मराठवाड्यात परभणी, जालना, लातूर, खान्देशात नंदूरबार, नाशिक, पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने हजेरी लावली. अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा तर जालना जिल्ह्यात दोघांचा असा एकूण ४ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पीक वाचविण्यासाठी पळापळ झाली.

खान्देशातील धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने पिकांना मोठा फटका बसला. नाशिक, अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला. या पावसाने कांदा, गहू अशा पिकांसोबत द्राक्ष, डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले. पुण्यात सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आभाळ एकदम भरून आले. त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाला. पिंपरी चिंचवडसह परिसरातही पावसाने गारासह हजेरी लावली.

वाकडमध्ये गारा, सांगवीत पडले झाड 

दुपारी हिंजवडी व वाकड परिसरात पावसासोबत गारा पडल्या. साधारण १० मिनिटे बोराच्या आकाराच्या गारा पडत होत्या. यामुळे रस्त्यावरील दुचाकीस्वारांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता.

अहिल्यानगरला गारांमुळे उडाली दाणादाण

अहिल्यानगर : संगमनेर, अकोले, १ श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या 'ऑरेंज अलर्ट'नंतर सोमवारी (३० मार्च) संध्याकाळी जळगाव शहरात जोरदार वाऱ्यासह अर्धा तास पाऊस झाला. वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सर्वत्र दाणादाण उडाली.

दर्शनासाठी जाताना वीज पडून दोन तरुण ठार

जालना शहरासह भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अंबड, परतूर तालुक्यांत सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान महाकाळ (ता. अंबड) येथे लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या तरुणांच्या अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी आहे. गोविंद प्रल्हाद लहाने (२१), आदित्य दगडू बेद्रे (२० दोघेही रा. महाकाळा) अशी मृतांची नावे असून विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना या तरुणांवर काळाने घाला घातला.

ऑरेंज अलर्ट 

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, सातारा या जिल्ह्यात.

यलो अलर्ट

 नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात.

नाशिकला द्राक्ष-डाळिंबांसह कांदा पिकाचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने गारपीटसह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर उन्हाळी कांदाही भिजल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. अनेक भागात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, सिन्नर, नांदगाव, येवला या तालुक्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बागलाण तालुक्यातील चौगाव, मुंजवाड या भागात गारपिटीने द्राक्ष, डाळिंब बागेसह कांदा पिकाचे तसेच काढून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hailstorm Havoc in Maharashtra; Farmers Scramble, Four Die from Lightning

Web Summary : Maharashtra faces hailstorm devastation, prompting farmers to save crops. Lightning strikes killed four in Ahilyanagar and Jalna. Nashik crops, including grapes and onions, suffered damage. Orange and Yellow alerts issued for various districts.
टॅग्स :पाऊसमुंबईपुणेअहिल्यानगर