Kunal Kamra Controversy: स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ठाणे की रिक्षा या गाण्यातून कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला. याप्रकरणी एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी कामराविरुद्ध पोलीस तक्रार देखील दाखल केली. दुसरीकडे, काही शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये कुणाल कामराचा हा शो झाला त्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. त्यामुळे आता द हॅबिटॅट क्लबने तिथले कार्यक्रम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये एका शोमध्ये कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन तोडफोड केली. त्यामुळे क्लबचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यानंतर द हॅबिटॅट क्लबने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली. कलाकार त्यांच्या विचारांसाठी पूर्णपणे जबाबदार असतात असं क्लबने म्हटलं आहे. कुणाल कामराच्या व्हिडिओच्या निर्मितीमध्ये हॅबिटॅटचा सहभाग नाही आणि त्याने व्यक्त केलेल्या मतांना आम्ही दुजोरा देत नाही. या व्हिडिओमुळे दुखावलेल्या सर्वांची आम्ही मनापासून आणि मनापासून माफी मागतो, असंही द हॅबिटॅट क्लबने म्हटलं आहे.
"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया
...तोपर्यंत कार्यक्रम बंद - द हॅबिटॅट क्लब
"नुकत्याच आमच्यावर झालेल्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे. कलाकार त्यांच्या विचारांसाठी आणि रचनात्मक निवडीसाठी पूर्णपणे जबाबदार असतात. कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटमध्ये आम्ही कधीही सहभागी झालो नाही, परंतु अलीकडील घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला लावले आहे की कसे जेव्हा जेव्हा एखादा कलाकार मर्यादा ओलांडतो तेव्हा आम्हाला कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष्य केले जाते. आमच्या ठिकाणी फक्त चांगले आणि हितकारी कंटेंट सादर केला जावा यासाठी आम्ही अभिव्यक्ती, भावना आणि कोणालाही दुखावणार नाही किंवा अपमान करणार नाही असे कंटेंट यांचं संतुलन कसे साधायचे याचा सर्वोत्तम मार्ग शोधून काढेपर्यंत आमचा वेन्यू आणि कार्यक्रम बंद ठेवत आहोत. आम्ही सर्व कलाकार, प्रेक्षक आणि भागधारकांना चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे विचार मोकळेपणाने मांडण्यासाठी आमंत्रित करतो आणि तुमचे मार्गदर्शन मागतो जेणेकरून आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा देखील आदर करू शकू, असं द हॅबिटॅट क्लबने म्हटलं आहे.