मुंबई - मुंबईत गणेशभक्तांची हेळसांड होत आहे. मुंबईत छोटे व्यावसायिक यांना नाहक त्रास देणे, बेकायदेशीर रस्ता रोको हे सगळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली सुरू आहे. मनोज जरांगे यांचे हे आंदोलन फक्त आंदोलन नसून पवित्र आझाद मैदानाला लांच्छन लावणारे हे आंदोलन आहे. अत्यंत हिनप्रकारे भाषा वापरली जात आहे. जरांगेंचे टाळकं ठिकाणावर आहे का? जे कुणी मसीहा, गॉडफादर आहेत त्यांना सांगायचे आहे, गणेशभक्त तुम्हाला माफ करणार नाहीत. गणपतीला मानणारे, पूजन करणारे तुम्हाला माफ करणार नाहीत. तुम्ही एका गोष्टी अनिष्ट गोष्टीला मदत करत आहेत. व्यासपीठावर अर्वाच्च भाषा बोलतो, लायकीप्रमाणे तो बोलत आहे अशा शब्दात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, शिव्यांची लाखोली जरांगेंच्या स्टेजवरून होत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केवळ दिखावा करून चालत नाही. अत्यंत खालच्या शब्दात जरांगे यांनी धनगर समाजाबाबत अपशब्द वापरले. एका समाजाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करणारे हे विधान नाही का? लाजिरवाणे शब्द त्यांनी वापरले. जे शब्द जरांगे यांनी उच्चारले ते सांगताही येत नाहीत. लाज वाटायला हवी. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर संविधानाचे ज्ञान नसणारा बोलतोय. निवृत्ती न्यायमूर्तींना कधीही न्यायाधीश म्हणून कोर्टात बोलावले जाऊ शकते. त्यांच्यासमोर कसली भाषा वापरली जाते? शरद पवार, उद्धव ठाकरे तुम्ही याचा विरोध करणार की नाही...याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच आज मुंबईतील मुख्य रस्ते, रेल्वे स्टेशन, रस्त्यांवरील फुटपाथ, विभाजक तोडण्याचे प्रयत्न करणे, हुल्लडबाजी करणे असले प्रकार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुरू आहेत. महापालिकेसमोर असलेल्या कारंज्यामध्ये तुम्ही अर्धनग्न आंघोळ केली. ही कोणती विकृती? हे आंदोलन स्पोन्सर्ड आहेत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना गावाकडे जावे सांगावे, जरांगेंची मागणी महाराष्ट्रातलं सरकारच नाही तर केंद्र सरकार आणि इतर राज्यातील सरकारही पूर्ण करू शकत नाहीत. जरांगे हा बाहुला असल्यासारखे बोलतोय असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
दरम्यान, जरांगेंची भाषा गावगड्याची नसून नीचपणाची आणि मुजोरपणाची आहे. जरांगेंचे लाड बंद करा, त्यांना उचलून अटक करा. कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही. जाणुनबुजून काही लोक रस्ता रोको करून पोलिसांची हुज्जत घालत आहेत. पोलिसांनी एक्शन मोडमध्ये यावे, त्यातून काही अघटित घडावे, महाराष्ट्र पेटवावा आणि त्यानंतर जरांगेंनी व्हिक्टिम कार्ड खेळावे हे सगळे ठरवून केले जात आहे असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.