मुंबई रेल्वे पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. लेखी परीक्षेवेळी कानात ब्लुटूथ डिव्हाइस टाकून प्रश्नांची उत्तरे मिळवणाऱ्या एका तरुणीला भरारी पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्व परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा आणि तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता आपल्या मेहनती जोरावर परीक्षा उत्तीर्ण करावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत सध्या रेल्वे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेखी परीक्षेच्या वेळी एका केंद्रावर ही तरुणी संशयास्पद हालचाली करताना आढळली. परीक्षकांचे लक्ष जाताच तिची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला काहीही आढळले नाही. मात्र, तिचे कसून तपासणी केली असता तिच्या कानात एक लहान ब्लुटूथ डिव्हाइस आढळून आले. या तरुणीने परीक्षेच्या हॉलबाहेर असलेल्या व्यक्तीकडून प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ब्लुटूथ डिव्हाइसचा वापर केल्याचे चौकशीत उधड झाले.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली असून संबंधित तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. या गैरप्रकारामुळे त्या तरुणीची उमेदवारी रद्द करण्यात आली असून, तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. "भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. अशा प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना भविष्यातील कोणत्याही शासकीय परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल", असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
Web Summary : A woman was caught using a Bluetooth device to cheat during a Mumbai Railway Police recruitment exam. She's been arrested, and faces disqualification from future government exams. Security has been tightened.
Web Summary : मुंबई रेलवे पुलिस भर्ती परीक्षा में एक युवती ब्लूटूथ डिवाइस से नकल करते हुए पकड़ी गई। उसे गिरफ्तार कर लिया गया है और भविष्य में सरकारी परीक्षाओं से अयोग्य घोषित किया जा सकता है। सुरक्षा कड़ी कर दी गई है।