Join us

कोस्टलच्या भरावभूमीत बहरणार हिरवळ! CSR फंडातून विकास करण्यासाठी पालिकेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:06 IST

यासाठी पालिकेला कोणताही खर्च येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोस्टल रोड तयार झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या ७० हेक्टर जागेवर प्रोमोनेड आणि लँडस्केपिंग करण्याच्या पालिकेच्या नियोजनाला अखेर वर्षभरानंतर मुहूर्त मिळाला आहे. मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानच्या या मोकळ्या जमिनीवर उद्यान आणि इतर सुविधांचा विकास आणि देखभाल करण्यासाठी पालिकेने आता विविध संस्था, आस्थापनांना आमंत्रित केले आहे. यासाठी पालिकेला कोणताही खर्च येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोस्टल रोड प्रकल्प जवळपास ९५ टक्के पूर्ण झाला असून, लवकरच तो पूर्णपणे खुला करण्यात येईल. या रोडसाठी भराव करण्यात आलेल्या तब्बल ७० हेक्टर जमिनीवर आता विविध नागरी सेवा सुविधा देण्याचे पालिकेने ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्याने, सायकल ट्रॅक आणि इतर नागरी सुविधांचा समावेश असेल. त्यातही सीएसआर निधीतून या सुविधा विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित संस्थेला पालिकेकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा निधी मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कोस्टल रोड प्रकल्पासाठी पालिकेला आतापर्यंत १४,००० कोटी रुपये खर्च आला आहे.

जाहिरातींना बंदी

कोस्टल रोडलगत उपलब्ध असलेल्या या भरावाच्या ७० हेक्टर मोकळ्या जागेवर सध्या नियमानुसार कोणत्याही जाहिराती करण्यास मनाई आहे. पालिका ही अट शिथिल करण्यासाठी न्यायालयात जाण्याची शक्यता असली तरी अद्याप त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अशा असतील सुविधा

  • उद्याने, बगिचे, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि अन्य लँडस्केपिंग.
  • परिसरात स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा.
  • दिशादर्शक आणि मार्ग दाखवणारे फलक.

७ कि.मी. लांबीचे प्रोमेनेड

कोस्टल रोडलगत असणाऱ्या प्रियदर्शनी पार्क ते वरळी या प्रोमेनेडचा विकास प्रशासनाकडून होणार असला तरी त्याची देखभाल संबंधित संस्थेकडे देण्यात येईल. येथील स्ट्रीट फर्निचर, बैठक व्यवस्था, सायकल ट्रॅक, प्रकाशव्यवस्था, पाणी तसेच सिंचन व्यवस्था हेही त्यात समाविष्ट असेल.

टॅग्स :मुंबई कोस्टल रोडमुंबई महानगरपालिकाजाहिरात