Great relief to Mumbaikars from Municipal Corporation; Water price hike canceled this year |  मुंबईकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा; यंदा पाणी दरवाढ रद्द

 मुंबईकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा; यंदा पाणी दरवाढ रद्द

 

मुंबई - गेले सहा महिने कोरोना आणि त्यांनतर भडकलेल्या महागाईची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांची यावर्षी पाणी दरवाढीतून सुटका झाली आहे. आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेने यंदा पाणीपट्टीत शंभर टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर गुरुवारी मंजुरीसाठी आणला. मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला.

 

पाणीपट्टीत दरवर्षी सरसकट आठ टक्के वाढ करण्यास २०१२ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणी दरवाढ करण्यात येते. मात्र यावर्षी झोपडपट्टीवगळता सोसायटी, इमारती, हॉटेल, व्यवसायिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात शंभर टक्के वाढ सुचवली होती. मात्र आठ टक्के दरवाढ करण्याचे ठरले असताना शंभर टक्के वाढ अन्यायकारक असल्याचे मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले. 

पाणी दरवाढीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, समाजवादी अशा सर्व पक्षांनी या मागणीचे समर्थन केले. सध्या, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पाणी दरवाढ लादणे अन्यायकारक असल्याचे मत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले. पाणी दरवाढीच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला.

* पालिकेला एक हजार लिटर पाणी उत्पादनासाठी १९.४४ रुपये खर्च येतो. त्या तुलनेत १०.४४ रुपये उत्पन्न मिळते. दरडोई प्रतिदिन १५० लिटर पाणी वापरणाऱ्यांना ५.२२ रुपये दर आकारण्यात येतो. मात्र दरवाढीत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

* दरडोई १५० लिटरपेक्षाही जास्त पाण्याचा वापर करणारे ( ताबा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतीतील रहिवाशी) २०.९० रुपये दर सध्या आकारले जात आहे. त्यांना ४१.८० रुपये दर आकारण्यात यावा, असे प्रस्तावित आहे. 

ग्राहक.....विद्यमान दर....प्रस्तावित दर(आकडेवारी रुपयांत)

दरडोई १५० लिटरपेक्षा अधिक व २०० लिटर - १०.४४ ....२०.८८

दरडोई २०० लिटर ते २५० लिटर - १५.६६ ...२६.१० 

दरडोई २५० लिटरपेक्षाही जास्त - २०.८८ .... ३१.३२ 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Great relief to Mumbaikars from Municipal Corporation; Water price hike canceled this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.