शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी

By सीमा महांगडे | Updated: March 23, 2025 15:55 IST2025-03-23T15:54:36+5:302025-03-23T15:55:40+5:30

धूळ नियंत्रणासाठी करण्यात येणार अशी उपाययोजना

Grass planting to begin soon at Shivaji Park ground; Approval from Municipal Environment Department | शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी

शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील (शिवाजी पार्क) उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या अंतिम अहवालाआधी ‘जी उत्तर’ विभागाने गवत लागवडीसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता. पर्यावरण विभागाने त्याकरिता ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मिळताच टप्प्याटप्प्याने रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे. पण पावसाआधी हे काम होणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. दरम्यान, सध्या दररोज सायंकाळी मैदानात पाणी फवारले जात आहे.

शिवाजी पार्कमधील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न कित्येक वर्षांत सोडविता आलेला नाही. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) सूचनेनंतर पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने या प्रश्नावर आयआयटी मुंबईचे मत घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार मैदानाच्या पाहणीअंती माती न काढण्याची शिफारस आयआयटीने केली होती. दरम्यान, आता संपूर्ण मैदानात गवताची लागवड करण्याचे आदेश ‘एमपीसीबी’ने दिले आहेत. 
क्रिकेट खेळपट्ट्यांचे क्षेत्र वगळता, सर्व भागांत पावसाळ्यापूर्वी गवताची लागवड करायची आहे. त्याकरिता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोणत्या प्रजातीचे गवत योग्य आहे, याची तपासणी करून त्याचा अहवाल पालिकेने ‘एमपीसीबी’ला द्यावा. तसेच गवत लागवडीचा कालावधी, गवताचा प्रकार, देखभालीचे वेळापत्रक आणि पाण्याचा स्रोत, याची माहिती अंतिम आराखड्यात द्यावी, असे नमूद आहे.

आयआयटीचा पुन्हा सल्ला

आयआयटी मुंबईच्या अंतिम अहवालाव्यतिरिक्त पालिकेचे विभाग कार्यालय पुन्हा आयआयटीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. गवताच्या लागवडीआधी जमीन, मातीचा अभ्यास करण्यासाठी व्यावसायिक क्युरेटरची मदत घेतली जाणार आहे. शिवाय, मैदानातील जलवाहिन्यांच्या संदर्भातील तरतुदीचाही या निधीत समावेश आहे.

...अन्यथा हरित लवादात दाद

पालिकेचा गवत लागवडीचा प्रयोग याआधी फसला आहे. पालिका फक्त वेळकाढूपणा करीत असल्याची टीका रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी केली. या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्यामुळे शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने आता न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरविले आहे. त्याकरिता उच्च न्यायालय किंवा हरित लवादाकडे दाद मागण्याचा संघटनेचा विचार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Grass planting to begin soon at Shivaji Park ground; Approval from Municipal Environment Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.