आजोबांना डेटिंग ॲपची मैत्री पडली सव्वापाच कोटींना! गमावली आयुष्यभराची पुंजी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 06:12 IST2025-04-05T06:12:32+5:302025-04-05T06:12:49+5:30

Mumbai Crime News: मलबार हिलमध्ये राहणाऱ्या ७५ वर्षीय आजोबांना टॉपफेससारख्या डेटिंग ॲपवरील मैत्रिणीच्या मधाळ संवादात अडकून ट्रेडिंग करणे भलतेच महागात पडले आहे. कोसळत असलेल्या शेअर मार्केटची भीती घालून अनोळखी ॲपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी ३९ लाखांना गंडवले.

Grandfather loses Rs 5.5 crore to dating app friend! Lost his life's capital, case registered | आजोबांना डेटिंग ॲपची मैत्री पडली सव्वापाच कोटींना! गमावली आयुष्यभराची पुंजी, गुन्हा दाखल

आजोबांना डेटिंग ॲपची मैत्री पडली सव्वापाच कोटींना! गमावली आयुष्यभराची पुंजी, गुन्हा दाखल

 मुंबई - मलबार हिलमध्ये राहणाऱ्या ७५ वर्षीय आजोबांना टॉपफेससारख्या डेटिंग ॲपवरील मैत्रिणीच्या मधाळ संवादात अडकून ट्रेडिंग करणे भलतेच महागात पडले आहे. कोसळत असलेल्या शेअर मार्केटची भीती घालून अनोळखी ॲपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी ३९ लाखांना गंडवले. ८० कोटींचा दिसणारा नफा निघत नसल्याच्या लक्षात येताच आजोबांची झोप उडाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी सायबर (दक्षिण) पोलिस तपास करत आहेत.

मलबार हिल परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय तक्रारदाराने शेअर अँड स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले आजोबा व्हाॅटसॲप, फेसबुक व मेसेंजर तसेच टॉपफेस या ॲपवर सक्रिय असायचे. 

गेल्यावर्षी जून महिन्यात टॉपफेसवर आकृती देसाई नावाच्या महिलेशी त्यांची ओळख झाली. मोबाइल क्रमांक शेअर होताच, दोघांमध्ये संवाद सुरू झाला. तिने ती नोएडा येथे राहत असल्याचे सांगितले. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आजोबांनीही मैत्रिणीला वैयक्तिक माहिती शेअर केली. तिने स्वतःचे कपड्याचे शोरूम असल्याचे सांगितले.  

पुरावे पोलिसांना केले सादर  
आजोबांनी शेअरमध्ये गुंतवणूक असल्याचे सांगताच, तिने शेअरचे भाव कोसळतात म्हणून जीइडब्ल्यूइ या ॲपवर गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून गुंतवणूक केली. त्यापैकी फक्त सुरुवातीला २० लाख रुपये काढता आल्याने त्यांचा विश्वास बसला. 

याच जाळ्यात अडकून आजोबांनी चाळीस व्यवहारात ५ कोटी ३९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. २७ जुलै २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ही गुंतवणूक केली. त्यामध्ये त्यांना ८० कोटींचा नफा झालेला दिसत होता. त्यांनी, एकूण गुंतवणूक व त्यावर झालेला ८० कोटींचा नफा काढण्याचा प्रयत्न करताच त्यांना  ३० टक्के टॅक्स फी द्यावी लागेल असे सांगितले. अखेर फसवणूक होत असल्याची खात्री पटताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तसेच सर्व पुरावे पोलिसांना सादर केले. तसेच १९३० या हेल्पलाइन क्रमांकावरही  तक्रार दिली.

Web Title: Grandfather loses Rs 5.5 crore to dating app friend! Lost his life's capital, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.