'सुंदरी'च्या मोहात 'आजोबा' घायाळ, व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शन; ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:38 IST2025-12-18T12:37:17+5:302025-12-18T12:38:00+5:30
११ महिन्यांत ३३ जणांचे बँक खाते रिकामे

'सुंदरी'च्या मोहात 'आजोबा' घायाळ, व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शन; ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट
मुंबई: माझगावमध्ये घरात एकटे असताना आजोबांना 'सुंदरी'चा व्हिडीओ कॉल आला. तिच्या मोहात घायाळ झालेल्या आजोबांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन दिवसांनी याच व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करत बैंक खाते रिकामे करण्यात आले. याप्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे गेल्या ११ महिन्यांत 'सुंदरी'च्या व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून ३३ जणांचे बँक खाते रिकामे झाले आहे. या घटनांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरले आहेत.
७५ वर्षीय व्यक्ती 'एअर इंडिया'मधून सेवानिवृत्त झाले असून, ते मुलासोबत राहतात. २ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. फोन उचलला असता एका सुंदरीने संवाद साधण्यास सुरुवात केली. तिच्या मोहात घायाळ झालेल्या आजोबांनी संवादाला प्रतिसाद दिला. तरुणी नग्न अवस्थेत होती व तिने आजोबांनाही तसे करण्यास प्रवृत्त केले. मात्र, आजोबाने नकार देत कॉल कट केला. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी पुन्हा कॉल आला. पोलिस अधिकारी राकेश अस्थाना बोलत असल्याचे सांगून तुमचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तुमचे अटक वॉरंट निघणार असल्याची भीती दाखवली.
तसेच व्हिडीओ हटवण्यासाठी राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राहुल याने व्हिडीओ हटवण्यासाठी पैशांची मागणी केली, तर त्या पोलिसाने तरुणीच्या शोधासाठी पैसे मागत यूपीआयची माहिती पाठवली. बदनामीच्या भीतीमुळे आजोबांनी २ लाख २३ हजार रुपये पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने आजोबांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
राजकीय मंडळीही जाळ्यात
सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडीओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळयात येताच याच व्हिडीओच्या आधारे, खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीकडून उच्च शिक्षिताबरोबर राजकीय मंडळींनाही टार्गेट करण्यात येत आहे.
२२ गुन्ह्यांत २३ अटकेत
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान सायबर फसवणुकीचे ४,२२२ गुन्हे नोंदविले आहेत. यात सेक्सटॉर्शनचे ३३ गुन्हे नोंद असून, २२ गुहांची उकल करून २३ जणांना अटक झाली आहे.
अशी घ्या काळजी
१. अशा घटनांपासून, सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा.
२. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. तो क्रमांक लगेच ब्लॉक करा.
३. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.