आंदोलनाला सरकारचे सहकार्यच, चर्चेतून मार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्ट ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 07:25 IST2025-08-30T07:23:51+5:302025-08-30T07:25:23+5:30

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

Government's support for the movement, discussion is the way out, Chief Minister Devendra Fadnavis gave a clear assurance | आंदोलनाला सरकारचे सहकार्यच, चर्चेतून मार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्ट ग्वाही

आंदोलनाला सरकारचे सहकार्यच, चर्चेतून मार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्ट ग्वाही

मुंबई - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर मंत्रिमंडळाची उपसमिती विचार करत आहे, न्या. शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय उपसमितीने घेतला. एकेक प्रश्न सोडवत आहोत.

जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार का या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, विविध पातळ्यांवर त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. आंदोलनावर तोडगा काढण्याचीच सरकारची भूमिका आहे. मागण्यांबाबत नुसती आश्वासने देऊन काहीही होणार नाही, कायदेशीर मार्ग काढण्यावर आमचा भर आहे. मी, एकनाथ शिंदे, अजित पवार आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहून त्या दृष्टीने विचार करत आहोत. मुंबईत काही तुरळक ठिकाणी रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत करण्याचे प्रकार घडले, पण पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी सहकार्य केले. आडमुठेपणाने कोणीही वागू नये असे माझे आवाहन आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्यानुसार सरकार आंदोलनाला सहकार्य करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला राज्यात १० टक्के आरक्षण आहेच, त्यानुसार नोकरभरती केली गेली आणि आताही सुरू आहे. हे आरक्षण कुठेही थांबलेले नाही. आमचे सरकार भक्कमपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभे आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

विरोधकांवर निशाणा
दोन समाजांमध्ये संघर्ष व्हावा अशी भूमिका विरोधकांची आहे, ते दोन जातींना एकमेकांशी झुंजवत आहेत, पण सरकारला तशी भूमिका घेता येणार नाही, त्यांना नाही पण आम्हाला सामाजिक विण जपायची आहे, असे सांगून फडणवीस यांनी महायुती सरकारने गेल्या दहा वर्षांत मराठा समाजासाठी काय केले त्याचीही माहिती पत्रकारांना दिली, मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर विरोधकांनी पोळी भाजू नये, त्यांचेच तोंड जळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Government's support for the movement, discussion is the way out, Chief Minister Devendra Fadnavis gave a clear assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.