Join us  

oxygen: ऑक्सिजनच्या मनमानी खरेदीला सरकारचा चाप, प्रत्येक जिल्ह्यासाठी आता प्रमाणित पद्धत ठरवून देणार

By यदू जोशी | Published: May 28, 2021 10:36 AM

Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत.

-यदू जोशीमुंबई : कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत. त्या तयार करण्यासाठी कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.ऑक्सिजनच्या खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासू लागल्यानंतर ऑक्सिजन खरेदीचा सपाटाच लावला गेला. सुमारे २५० कोटी रुपये किमतीचे सुमारे २५० पीएसए ऑक्सिजन जनरेटरची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. हे जनरेटर हवेतून ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा केला जातो.  या खरेदीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्रास पायमल्ली करण्यात आल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणच्या किमतीमध्येही समानता नाही. महामारीच्या नावाखाली निविदा न काढता वा लघुनिविदा काढून ही खरेदी करताना विशिष्ट कंपन्यांना झुकते माप दिले गेल्याचे म्हटले जाते.राज्याचे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्याकडे राज्यभरातील ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आल्यानंतर खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नारनवरे यांनी पाऊले उचलली आहेत. कुशवाह समिती येत्या एक-दोन दिवसांत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे अहवाल देणार असून, त्यानंतर लगेच खरेदीबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. तसेच खरेदीसाठीचे टेंडर फॉर्म सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले जातील व त्यानुसारच खरेदी करणे अनिवार्य असेल. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यास स्वत:च्या अधिकारात टेंडरचे स्वरूप निश्चित करण्याचे अधिकार नसतील.  आतापर्यंत करण्यात आलेल्या खरेदीचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने खरेदीतील अनियमितता समोर येईल. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या ‘समन्वया’तून अनेक ठिकाणी ‘अर्थपूर्ण’ खरेदी झाली, असे म्हटले जाते.   कुशवाह समिती आधीच स्थापन केली असती, तर मनमानी खरेदीला चाप बसला असता. शासनाने नेमली समिती-पीएसए ऑक्सिजन जनरेटरची कोट्यवधींची खरेदी सुरू असताना, आता त्यांच्या उपयुक्ततेबद्दल तसेच देखभालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. -जेवढ्या जनरेटरची खरेदी करण्यात आली त्यापैकी दहा टक्केही राज्यातील रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये अद्याप लागलेले नाहीत.  

५६ हजार कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर - राज्यात आजमितीस ५६ हजार कोरोना रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. १५ दिवसांपूर्वी ही संख्या ९६ हजार इतकी होती. - याचा अर्थ ती आता निम्म्यावर आली आहे. राज्याची ऑक्सिजनची गरज दरदिवशी १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकीच आहे. २४ ते ४८ तास पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे घाईघाईने खरेदी करण्याची आता गरज राहिली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसऑक्सिजनसरकारमहाराष्ट्र सरकार