‘मुंबईकरांना हद्दपार करायला सरकारने घेतली सुपारी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 09:01 IST2024-08-18T08:52:39+5:302024-08-18T09:01:25+5:30
आरसीएफमधील शिवसेना (ठाकरे) कर्मचाऱ्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले.

‘मुंबईकरांना हद्दपार करायला सरकारने घेतली सुपारी’
मुंबई : दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबईचा हक्काचा भूखंड बुलेट ट्रेनला देऊन टाकला. मुंबईतले मोक्याचे भूखंड अदानी-लोढाच्या घशात घातले जात असून, नव्याने संकटे उभी राहत आहेत. आताच्या खोके सरकारने मुंबई विकायला काढली असून, मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे, अशी सुपारी सरकारने घेतली आहे, असा आरोप उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.
आरसीएफमधील शिवसेना (ठाकरे) कर्मचाऱ्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईला संपवायचे आणि मराठी माणसाला बेकार करायचे, असे सध्या सुरू आहे. मुंबईत सगळे गुण्यागोविंदाने राहत असून, हिंदूंचे संरक्षण आम्ही हिंदू म्हणून केले. आता आपल्यासोबत इतर समाजाचेही लोक येत आहेत. एवढे सगळे व्यवस्थित सुरू असताना मिठाचा खडा का टाकताय, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.