Join us

महसूलमंत्र्यांवर आरोप; सरकारची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 06:04 IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेले आरोप जर कामकाजातून काढून टाकले असतील तर त्या आरोपांना उत्तर देणारे मंत्र्यांचे निवेदन कसे काय कामकाजाचा भाग होऊ शकते?

मुंबई : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर करण्यात आलेले आरोप जर कामकाजातून काढून टाकले असतील तर त्या आरोपांना उत्तर देणारे मंत्र्यांचे निवेदन कसे काय कामकाजाचा भाग होऊ शकते? असा सवाल करत विरोधकांनी सभागृहात सरकारची कोंडी केली.कामकाज तहकूब झाल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांनी काल सभागृहात केलेल्या भाषणावर निवेदन करावा असा तोडगा काढला गेला. त्यानंतरही आ. पाटील यांनी सभागृहात त्याच आरोपांचा पुनरुच्चार करत त्यासंबंधीचे काही पुरावेही सभागृहात आज सादर केले.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केलेले आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात एक निवेदन करून आज फेटाळून लावले. त्यास विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. आपण सभागृहात केलेले आरोप अध्यक्षांनी कालच कामकाजातून काढून टाकले आहेत. त्यावर मंत्र्यांना निवेदन कसे करता येऊ शकते, असा सवाल आ. पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले. जयंत पाटील यांचे आरोप पुन्हा कामकाजात घ्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली.दुसरीकडे संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे निवेदन नियमाला धरूनच आहे, असे सांगितले. तर आजवर विरोधकांनी केलेले कोणतेही आरोप, भाषण कामकाजातून काढलेले नाहीत, असे सांगत एकनाथ खडसे यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र सरकार