Join us

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष, गैरप्रकारास वाव नाही – एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 23:18 IST

Mumbai: परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुंबई - राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार