विधवा, एकल महिलांना सरकारची भेट; मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवली; सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:49 IST2025-09-28T13:49:24+5:302025-09-28T13:49:45+5:30
कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुले व विधवा महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे.

विधवा, एकल महिलांना सरकारची भेट; मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवली; सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार
मुंबई : कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुले व विधवा महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, यामध्ये सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल.
गरजू, अनाथ, बेवारस, सोडून दिलेल्या व शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे संरक्षण, पुनर्वसन करणे, मुलांना सुरक्षित, पोषणयुक्त वातावरण, मूलभूत सेवा व शक्य असल्यास दत्तक व्यवस्था सुलभ करणे हा मिशन वात्सल्य योजनेचा उद्देश आहे. या योजनेत विधवा, एकल महिलांचा समावेश करून त्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत.
कठीण परिस्थितीत मुलांचे संरक्षण अन् शिक्षण, आरोग्य
> कठीण परिस्थितीत असलेल्या मुलांचे संरक्षण करणे.
> त्यांच्या काळजीसाठी बालसंगोपन संस्था, निरीक्षणगृह व बालगृहांची व्यवस्था.
> कायदेशीर दत्तक प्रक्रिया सुलभ करणे.
> शिक्षण, आरोग्य व मानसोपचार सेवा.
> गैर-संस्थात्मक मुलास दरमहा ४,००० रुपयांची मदत.
> संस्थेतून बाहेर पडलेल्या १८ वर्षांवरील मुलांनाही ४,००० रुपयांची मदत.
> अडचणीत असलेल्या मुलांना हेल्पलाइनद्वारे त्वरित मदत.
कुणासाठी मदत?
अनाथ, बेवारस, बालमजुरीतून मुक्त केलेली मुले, बाल तस्करी, लैंगिक शोषणातून वाचवलेली मुले यांना या योजनेतून मदत.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या अनाथ मुले, विधवा आणि एकल महिलांना लागू होणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. अनाथ मुलांना मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, तसेच विधवा महिलांना विधवा पेन्शन, रेशनकार्ड, निवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजना मिळवून देण्यात येत आहेत.
अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री