शुक्ला कंपाउंडच्या पीडितांसाठी गोपाळ शेट्टी यांची विधानसभा अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:59 IST2025-12-08T15:58:06+5:302025-12-08T15:59:10+5:30
Mumbai News: दहिसर (पूर्व) रावळपाडा येथील शुक्ला कंपाउंडमधील शेकडो झोपडीधारक आणि लघु उद्योजकांवर झालेल्या कथित अन्यायकारक निष्कासनाविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

शुक्ला कंपाउंडच्या पीडितांसाठी गोपाळ शेट्टी यांची विधानसभा अध्यक्षांकडे संयुक्त बैठकीची मागणी
मुंबई - दहिसर (पूर्व) रावळपाडा येथील शुक्ला कंपाउंडमधील शेकडो झोपडीधारक आणि लघु उद्योजकांवर झालेल्या कथित अन्यायकारक निष्कासनाविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नुकतीच भेट घेवून त्यांना निवेदन दिले असून तातडीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.
शुक्ला कंपाउंड ही खाजगी मालकीची जमीन असून गेली ४० हून अधिक वर्षे येथे रहिवासी व छोटे व्यावसायिक आपला संसार आणि व्यवसाय चालवतात. रहिवासी नियमित भाडे देत असून चाळमालक महापालिकेला कर भरतो. अनेकांना महापालिकेचे कायदेशीर परवानेही मिळालेले आहेत.
मात्र, विकासकाने जमीन मालकाकडून कन्व्हेअन्स घेतल्याच्या आधारावर महापालिकेकडून कलम ३५१ चे नोटिसा बजावण्यात आल्या आणि १९६२ पूर्वीचे पुरावे नसल्याचे कारण देत न्यायालयीन प्रक्रियेतून झोपड्या व गाळे निष्कासित करण्यास सुरुवात झाली. शुक्ला कंपाउंड येथे गेली ४५ वर्ष वास्तव्य करीत असलेल्या ४०० कुटुंबांना विकासकाने १९६२ पूर्वीची कागदपत्रे असणाऱ्या कुटुंबालाच घर मिळतील असे सांगितले आहे. त्यामुळे ही डेट ऑफ लाईन सरकारने बदलावी अशी आग्रही मागणी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या कडे केली.
शेट्टींच्या म्हणण्यानुसार ही कारवाई “गैरप्रकाराने व अन्यायकारक पद्धतीने” झालेली असून अनेक कुटुंबे आणि लघु उद्योग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भात त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून एसआरएने वसाहत स्लम घोषित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पत्रही जारी केले आहे. शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला हक्काचे पक्के घर’ या धोरणाचा उल्लेख करत म्हटले की,“महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीतील रहिवाशांचे संरक्षण करणारे स्पष्ट कायदे केले असतानाही अशा प्रकारचे निष्कासन मी माझ्या ४५ वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात कधी पाहिले नाही.”
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे तळागाळातून वर आलेले नेते असून ते निश्चितच या प्रकरणात न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतील,शुक्ला कंपाउंडमधील रहिवाशांना योग्य तोडगा आणि न्याय देतील. असा विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला.