अलविदा... बेस्ट बस क्रमांक १९४२! गोराई ते बॅकबे दरम्यान शेवटची विशेष फेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:16 IST2025-10-20T11:15:52+5:302025-10-20T11:16:41+5:30
यानिमित्ताने १९४२ चा सुवर्णकाळ हरवल्याची प्रतिक्रिया हौशी बसप्रेमी, आगारातील अधिकारी आणि बेस्ट संस्थांनी यावेळी व्यक्त केली.

अलविदा... बेस्ट बस क्रमांक १९४२! गोराई ते बॅकबे दरम्यान शेवटची विशेष फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘बेस्ट’च्या ताफ्यात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण योजनेंतर्गत (जेएनएनयुआरएम) १५ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या विना वातानुकूलित (नॉन एसी) बसगाड्या हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहेत. गोराई आगारातील अशोक लेलँड कंपनीची जेएनएनयुआरएम (सीएनजी) बस क्रमांक १९४२ ही ‘सुरक्षितता हेच आमचे ध्येय’ या ब्रीद वाक्यासह मुंबईकरांचा निरोप घेऊन गेली. यानिमित्ताने १९४२ चा सुवर्णकाळ हरवल्याची प्रतिक्रिया हौशी बसप्रेमी, आगारातील अधिकारी आणि बेस्ट संस्थांनी यावेळी व्यक्त केली.
‘आपली बेस्ट आपल्यासाठीच’ या संस्थेचे पदाधिकारी आणि हौशी बसप्रेमी मंडळींनी संयुक्तरीत्या या बसचा निरोप सोहळा आयोजित केला होता. या दिवशी सकाळी त्यांनी बस क्रमांक १९४२ मधून गोराई आगार ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करत वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि नव्याने तयार झालेल्या कोस्टल रोड मार्गे दक्षिण मुंबई गाठली.
स्वत:च्या बस नामशेष होण्याच्या मार्गावर
२००९ मध्ये जेएनएनयुआरएम अंतर्गत ‘बेस्ट’ला स्वत: मालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या ७५० बस मिळाल्या होत्या. मात्र, कालांतराने बिघाड, वाढता देखभाल खर्च, सुट्ट्या भागांची टंचाई आणि नव्या गाड्यांच्या तुलनेत असलेली अपुरी कार्यक्षमता, यामुळे या बस ताफ्यातून बाद झाल्या.
‘१९४२’ ही त्या ताफ्यातील शेवटच्या काही उरलेल्या बस गाड्यांपैकी एक होती. आज ‘बेस्ट’च्या स्वत:च्या केवळ २५४ बस उरल्या आहेत. एकेकाळी हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या ‘बेस्ट’च्या स्वतःच्या बसगाड्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब मुंबईसाठी अत्यंत चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया ‘आपली बेस्ट आपल्यासाठीच’ संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठित स्थळांच्या भेटीने दीर्घ सेवेला सलाम
या प्रवासादरम्यान या बसने नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा, बॅकबे यासारख्या अनेक प्रतिष्ठित स्थळांना भेट देत, आपल्या दीर्घ सेवेला शेवटचा सलाम केला. या गाडीला निरोप देताना, ही बस केवळ वाहन नव्हती, तर आमच्या आयुष्याचा एक भाग होती. रोज तिचे इंजिन सुरू करताना जणू एखादा मित्र भेटतोय असे वाटायचे, अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
‘बेस्ट’च्या सुवर्णकाळाला गालबोट लावणारे निर्णय आणि निधीअभावी सेवांचा ऱ्हास, या सर्व घटकांमुळे ‘बेस्ट’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसारख्या महाकाय शहरात सार्वजनिक वाहतुकीचे जाळे ‘बेस्ट’पासून सुरू होते. त्यामुळे ते वाचवण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. - रुपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्यासाठी