Join us

मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:52 IST

Mumbai Crime news: ‘डीआरआय’च्या पथकाने रविवारी मस्जिद बंदर येथील सोने वितळवणाऱ्या युनिटवर छापा टाकून कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले.

मुंबई : तस्करीतील सोने वितळवणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. मस्जिद बंदर येथे रविवारी छापा टाकून नऊ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. त्याचबरोबर सातजणांना अटक करण्यात आली आहे. 

परदेशातून तेथील नागरिकांच्या मदतीने सोन्याच्या केल्या जाणाऱ्या तस्करीप्रकरणी ‘डीआरआय’ चौकशी करत होती. त्यावेळी विमानतळावरील काही कर्मचारीही त्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी परदेशातून तस्करी करून आणलेले सोने आरोपींपर्यंत पोहोचवायचे. त्यानंतर मस्जिद बंदर येथील युनिटमध्ये ते वितळवून येथील बाजारात छुप्या पद्धतीने विकले जात होते.

कागदपत्रे दिली नाहीत

या माहितीच्या आधारे कारवाई करत ‘डीआरआय’च्या पथकाने रविवारी मस्जिद बंदर येथील सोने वितळवणाऱ्या युनिटवर छापा टाकून कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत आठ कोटी ९३ लाख रुपयांचे आठ किलो ७४७ ग्रॅम वजनाचे सहा सोन्याचे लगड जप्त केले.

याप्रकरणी मीनानाथ भुले, विश्वास यादव ऊर्फ अमोल, उदय जंगम, रोहित मोहिते आणि विक्रम मोटे व राजकुमार पवार यांना बेड्या ठोकल्या आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या सोने खरेदीच्या पावत्या मागताच त्यांनी अधिकृत कागदपत्रे जमा केली नाहीत.

युनिट मालक जेरबंद

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सोने वितवळणाऱ्या युनिटचा मालक राजकुमार पवार, चालक रवींद्र साळुंखे यांनाही या प्रकरणात अटक केली. 

विमानतळ कर्मचारी रडारवर

विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून तस्करीचे सोने घेतले जात होते. यामध्ये नेमक्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? याचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हवाला मार्गाने पैसे पाठविल्याचा संशय आहे.

असे चालायचे काम...

भुले हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून तस्करीचे सोने घेत ते वितळवून पुढे ग्राहकांना पोहोचवत असे. यादव हा तस्करीच्या सोन्याच्या सर्व व्यवहारांची नोंद करायचा. जंगम आणि मोहिते हे दोघे सोने वितळवत असत. मोटे हा चालक असून, त्याच्यावर विमानतळावरून तस्करीचे सोने आणण्याची जबाबदारी होती. 

टॅग्स :सोनंतस्करीगुन्हेगारीमुंबई पोलीस