मुंबई : मुंबई विमानतळावर दोन प्रकरणांत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण तीन कोटी ६७ लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये विमानतळावरील खासगी आस्थापनांत काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विमानतळावरील एका दुकानातील कर्मचारी प्रदीप पवार याचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी व तपासणी केली. त्यावेळी त्याने पँटमध्ये सोन्याची पेस्ट लपविल्याचे आढळून आले.
एका प्रवाशाने ती आपल्याला दिल्याचे सांगितले, तसेच ही पेस्ट मोहम्मद इम्रान नागोरी या व्यक्तीला पोहोचविण्यास सांगितले होते. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी नागोरी याला अटक केली. त्याने चौकशीत अंशू गुप्ता या विमानतळावर काम करणाऱ्या आणखी एका महिला कर्मचाऱ्याने नाव सांगितले. या महिलेचाही तस्करीत समावेश असल्याचे दिसून आल्यावर अधिकाऱ्यांनी तिलादेखील अटक केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात विमानतळावरच काम करणाऱ्या आणखी एका कर्मचाऱ्याला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या एका प्रवाशाने हे सोने आपल्याला दिल्याची कबुली त्याने अधिकाऱ्यांना दिली.