मैत्रिणीच्या भेटीने सराईत सोनसाखळी चोरटा जाळ्यात; पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:07 IST2025-05-28T10:07:14+5:302025-05-28T10:07:14+5:30
घाटकोपर पोलिसांची पुण्यात कारवाई

मैत्रिणीच्या भेटीने सराईत सोनसाखळी चोरटा जाळ्यात; पुण्यातून अटक
मुंबई : मुंबईत धूमस्टाईलने सोनसाखळ्या चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी करत घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकत अटक केली आहे. आकाश लोखंडे असे अटक आरोपीचे नाव आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला घाटकोपर स्थानकात सोडायला गेला होता. पोलिसांनी हाच धागा पकडून त्याला अटक केली आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी परिसरात राहणाऱ्या रंजना घुटुगडे या २० मेच्या सायंकाळी सातच्या सुमारास घरी परतत असताना दुचाकीस्वाराने त्यांची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. घुटुगडे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच, त्याने घुटुगडे यांना ढकलून पळ काढला. यात त्या जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवत घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला. घाटकोपर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपाली कुलकर्णी, तपास अधिकारी कैलास तिरमारे, ज्ञानेश्वर खरमाटे आणि पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि अंमलदार यांची पथके तयार करून तब्बल ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
अशी केली अटक
आरोपी लोखंडे हा गुन्हा करण्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला घाटकोपर स्थानकात सोडायला गेला होता. तेथून रिक्षा पकडून ही मैत्रिण भटवाडीमध्ये गेली. पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध घेत लोखंडेच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले.
तिच्याकडे चाैकशी करून लोखंडेला हेरले. तो पुण्यातील शिरोली, आंबेगाव येथे गेला होता. पोलिस पथकाने पुण्यात जात येथील तळेगाव एमआयडीसी परिसरातून लोखंडेला ताब्यात घेतले.