Join us

गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:07 IST

रविवारी झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल नव्याने बांधून विक्रमी वेळेत पूर्णत्वास आला आहे. अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्वितीय नमुना ठरला आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी काढले. या पुलाच्या जोडणीमुळे मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. 

रविवारी झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, आमदार मुरजी पटेल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह स्थानिक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञान, ॲन्टी-कोरोजन स्टील आणि कंपन शोषण करणारे विशेष जॉइंट्स ही या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली आहे. या पुलामुळे अंधेरीतील रहदारीचा बोजा कमी होणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद व सुगम प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  यावेळी खा. वायकर अंधेरीतील उषा नाला आणि विल्सन टॉकीज यांना जोडणारा उड्डाणपूल नव्याने तयार करण्याची गरज असून त्यासाठी सर्वेक्षण करावे आणि मढ - मार्वे पुलाचे कामदेखील हाती घ्यावे, अशी सूचना पालिकेला केली.

कमीत कमी असुविधा कशी होईल, याचे नियोजन

पालिकेच्या पूल विभागाने पावसाळ्यापूर्वी ३ उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन केले असून गोखले पुलाबरोबरच ३१ मे पर्यंत विक्रोळी पूल आणि  १० जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली.

पूल विभागाने गुणवत्ता आणि गती यांवर लक्ष केंद्रित करतानाच कामे सुरू असताना, नागरिकांना कमीत कमी असुविधा कशी होईल, याचेही नियोजन केले आहे, असे बांगर यांनी नमूद केले.

दरम्यान, उर्वरित दोन्ही पूल लवकरच सुरू होणार असल्याने मुबंईतील या वर्दळीच्या भागात होणारा वाहतुकीचा खोळंबा पावसाळ्यापूर्वी दूर होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :आशीष शेलारभाजपा