गोव्यातील तरुणाची मुंबईत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 02:38 IST2019-12-11T02:38:18+5:302019-12-11T02:38:35+5:30
इमारतीच्या १५ व्या मजल्यावरील रिफुजी एरियामध्ये अभिषेक मृतावस्थेत आढळून आला.

गोव्यातील तरुणाची मुंबईत आत्महत्या
मुंबई : भांडुपमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या गोव्यातील २७ वर्षीय तरुणाने दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कुठल्या तरी आजारामुळे तो मानसिक तणावाखाली होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.
अभिषेक अय्यर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मूळचा गोवा येथे राहणारा अभिषेक हा पवईतील एका फायनान्स कंपनीत नोकरीला होता. भांडुप पश्चिमेकडील ‘रुणवाल ग्रीन’ येथील ७ क्रमांकाच्या ४० मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तो पेइंग गेस्ट म्हणून राहत होता.
सोमवारी रात्री त्याच इमारतीच्या १५ व्या मजल्यावरील रिफुजी एरियामध्ये अभिषेक मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या. स्थानिकांकडून घटनेची वर्दी मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. अभिषेकच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देताच त्याचे आईवडील मुंबईत दाखल झाले. अभिषेकचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.