Goa Assembly Election 2022 : कसला गमछा चाललाय, 792 मतं मिळालेली शिवसेना गोव्यात सत्ता स्थापन करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:46 IST2022-01-18T16:32:30+5:302022-01-18T16:46:55+5:30
पाटील यांनी गत पंचवार्षिक विधानसभा निवडणुकांची आकडेवारीच सांगितली आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं उत्तर प्रदेश व गोव्यात किती जागा लढवल्या

Goa Assembly Election 2022 : कसला गमछा चाललाय, 792 मतं मिळालेली शिवसेना गोव्यात सत्ता स्थापन करणार का?
मुंबई - उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याचं विधान केलं आहे. तसेच, गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करण्यासंदर्भातही राऊत सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यावरुन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आरसा दाखवलाय.
पाटील यांनी गत पंचवार्षिक विधानसभा निवडणुकांची आकडेवारीच सांगितली आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं उत्तर प्रदेश व गोव्यात किती जागा लढवल्या, किती मतं मिळवली आणि निकालात या दोन्ही पक्षांची झालेली वाताहत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
शिवसेना नेते संजय राऊत हे गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत सातत्याने विधान करत आहेत. शिवसेनेला गोव्यात 2017 च्या निवडणुकीत एकूण 792 मतं मिळाली, ही टक्केवारी 1.03 टक्के एवढी आहेत. मला सुरुवातीला वाटलं साईटमध्ये काहीतरी गडबड असेल. पण, ही आकडेवारी खरी आहे. आता, हे गोव्यात सरकार बनविणार आहेत, सरकार बनविणाऱ्यांना मदत करणार आहेत, काहीतरी महासंघटन करणार आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं 57 जागा लढवल्या, तिथं 11 कोटी मतदारांपैकी 88 हजार 595 मतं मिळाली आहेत. शिवसेनेचं 57 पैकी 56 जागांवर डिपॉझिट जप्त झालं आहे. सरासरी 1554 हजारांएवढी मतं आहेत. अन् हे टिकैत यांना बरोबर घेणार आहेत, सपाला आवाहन करणार आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला गतनिवडणुकीतील निकालाच आरसा दाखवला आहे.
युपीमध्ये 403 पैकी 30 जागा राष्ट्रवादीने लढल्या होत्या, या 30 पैकी 30 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. राष्ट्रवादीला एकूण 33 हजार 494 मतं त्यांना मिळाली. तर, गोव्यात 17 जागांपैकी 16 जागांवर डिपॉझिट जप्त झाली आहे. येथे एकूण मतं मिळाली 20,916, अशी आकडेवाडी पाटील यांनी सांगितली. तसेच, कसला गमछा चाललाय, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार प्रहार केला.
हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यात निवडणूक लढवावी
तुम्ही संजय राऊत यांची वक्तवे चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसले आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा. आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे, पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.