कुठे पण चला, पण चला... नागरिकांना लागतेय पिकनिकची ओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 03:46 AM2020-11-07T03:46:42+5:302020-11-07T03:47:26+5:30

picnic : पाश्चिमात्य देशात कोरोनाची लाट आल्याने पर्यटन व्यवसायावर अनिश्चिततेचे सावट आहे. आंतराष्ट्रीय पर्यटन पूर्णपणे ठप्प आहे.

Go anywhere, but go ... Citizens have a craving for picnics | कुठे पण चला, पण चला... नागरिकांना लागतेय पिकनिकची ओढ

कुठे पण चला, पण चला... नागरिकांना लागतेय पिकनिकची ओढ

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था 'कुठे पण चला, पण चला' अशी झाली आहे. त्यामुळे अनलाॅकमध्ये निर्बंध शिथिल होऊ लागताच नागरिकांची पावले पर्यटन आणि पिकनिकसाठी बाहेर पडू लागली आहेत. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे मित्र-परिवारासोबत जवळच्या पिकनिक स्पाॅट, रिसाॅर्टस आणि हाॅटेलमध्ये वेळ घालविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे.
पाश्चिमात्य देशात कोरोनाची लाट आल्याने पर्यटन व्यवसायावर अनिश्चिततेचे सावट आहे. आंतराष्ट्रीय पर्यटन पूर्णपणे ठप्प आहे. भारतासाठी सध्या दुबई आणि मालदीव ही दोनच ठिकाणे पर्यटनासाठी खुली आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य परदेशी पर्यटकांपेक्षा भारतीयांची जरा जास्तच कसून तपासणी होत असते. याशिवाय, अन्य काही देशात पर्यटन सुरू असले तरी वेगवेगळ्या नियमावलीमुळे प्रवास जिकीरीचा आहे. थायलंडसारख्या देशात गेल्यास १४ दिवसांचे विलगीकरण आणि १६ दिवसांचे मुक्काम अशी ३० दिवसांची टूर गळ्यात पडते. त्यामुळे सध्या परदेशी पर्यटनाला ब्रेकच लागल्याची माहिती राजा-राणी ट्रँव्हल्सचे संचालक विश्वजित पाटील यांनी दिली.
तर, सध्या लोकांकडून पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे. कोविड आणि लाॅकडाऊनचा हा एकप्रकारे उलटा परिणाम आहे. लोक कंटाळले आहेत. त्याचवेळी परदेशी पर्यटनात दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. काही अघटीत घडल्यास पैसे परत मिळणार का, या शंकेने लोक सध्या देशांतर्गत पर्यटनाकडे वळली आहेत. त्यामुळे गोवा, महाबळेश्वर, माथेरान अशा ठिकाणांना सध्या सर्वाधिक पसंती आहे. दिवाळीनंतरच्या काही दिवसांचे बुकिंग सध्या फुल्ल आहे, अशी माहिती विहार हाॅलिडेजचे संचालक संजय वझे यांनी दिली.
हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील पर्यटन पूर्णपणे सुरू झाले आहे. मात्र, नियम आणि कोरोनाची सुप्त भीती यामुळे सध्या पर्यटकांनी अन्य राज्यात हिंडण्यापेक्षा आपल्या जवळच्या स्थानांना प्राधान्य दिले आहे.

नव्या बुकींगचे वायदे   
 कोरोनामुळे मागील अनेक महिन्यात नागरिकांचे देश-परदेशातील पिकनिकचे बेत फसले. मात्र, यातील बहुतांश लोकांना अद्याप बुकींगचे पैसेच मिळालेले नाहीत. काही प्रतिष्ठित कंपन्या सोडल्या तर अनेक छोट्यामोठ्या टूर कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे पैसे बुडाले. 
 शिवाय, न्यायालयानेही पैसे देणे शक्य नसल्यास स्थिती सामान्य झाल्यावर त्याच सेवा देण्याची मुभा दिल्याने बहुतांश कंपन्यांकडून नव्या बुकींगचे वायदे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या बाहेर नको इथे फिरू, अशी लोकांची मानसिकता बनली आहे.

Web Title: Go anywhere, but go ... Citizens have a craving for picnics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.