‘अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:35 IST2025-11-03T15:23:58+5:302025-11-03T15:35:06+5:30
Seven Hills Hospital : अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.

‘अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या’, काँग्रेसची मागणी
मुंबई - अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटलमुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीएमसी व संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे परंतु मुख्यमंत्री वा कोणत्याही यंत्रणांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही हे गंभीर आहे. भाजपा महायुती सरकारला मुंबईकांच्या आरोग्याची चिंता नाही त्यांना फक्त उद्योगपतींचे हित पहायचे आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येउ शकते.
सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचे आरोग्य केंद्र बनू शकते. अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजार भावानुसार ३००० ते ४००० कोटी रुपये किंमत आहे पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजेश शर्मा म्हणाले.