‘मगरीं’च्या पवई तलावाला ‘रामसर’ दर्जा द्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:22 IST2025-10-15T10:21:11+5:302025-10-15T10:22:06+5:30
पवई तलावाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्याची विनंती पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यामुळे पवई तलावासारख्या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘मगरीं’च्या पवई तलावाला ‘रामसर’ दर्जा द्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवई तलावात अनेक प्रजातींचे वास्तव्य असून, मगरी मोठ्या प्रमाणावर आढळतात. या मगरीलगतच्या रहिवासी क्षेत्रात अनेकदा निदर्शनास आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे वाढत्या धोक्यांना तोंड द्यावे लागत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पवई तलावाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा म्हणून ‘रामसर’ दर्जा द्या, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या गटांनी केली आहे.
पवई तलावाला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्याची विनंती पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यामुळे पवई तलावासारख्या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले, दररोज १८ दशलक्ष लिटर सांडपाणी पवई तलावात वाहते, तरीही तलाव स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला अद्याप गती मिळालेली नाही. पवई तलावाला रामसर स्थळाचा दर्जा दिला तर ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यानंतर पवई तलाव हे मुंबईचे दुसरे रामसर स्थळ बनेल असे मत व्यक्त होत आहे.
पर्यावरणप्रेमींची मागणी
सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांनी सांगितले, रामसर दर्जा मिळणे हे पाणथळ जागांचे वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाचे आहे. शहरीकरण आणि अनियंत्रित प्रदूषणामुळे आपण आपले पर्यावरण जपले पाहिजे.
पवईसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या प्रगत स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पामेला चीमा यांच्या मते, जर विलंब होत राहिला तर मुंबई त्याच्या सर्वात मौल्यवान नैसर्गिक संपत्तीपैकी एक तलाव गमावू शकते.
रामसर दर्जा म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागा म्हणून दिलेला विशेष दर्जा आहे. जो रामसर कराराअंतर्गत पाणथळ जागांचे संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी दिला जातो.