एक कोटी द्या, नाहीतर अशोक सावंतप्रमाणे...! बिल्डरकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

By गौरी टेंबकर | Published: June 15, 2024 09:31 AM2024-06-15T09:31:49+5:302024-06-15T09:32:27+5:30

या विरोधात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मधुकर उर्फ आऊ मासावकर नामक इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे...

Give one crore, otherwise I will beat you like Ashok Sawant Threatened to kill the builder demanding ransom | एक कोटी द्या, नाहीतर अशोक सावंतप्रमाणे...! बिल्डरकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

एक कोटी द्या, नाहीतर अशोक सावंतप्रमाणे...! बिल्डरकडे खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी


मुंबई: मला एक कोटी द्या नाहीतर माजी नगरसेवक अशोक सावंत प्रमाणे तुम्हाला रस्त्यावर ठोकेन, अशी धमकी दिलीप ठक्कर या बिल्डरला समतानगर पोलिसांच्या हद्दीत देण्यात आली. या विरोधात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मधुकर उर्फ आऊ मासावकर नामक इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

तक्रारदार सतीश हेगडे (५६) हे एचडी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करतात. सदर कंपनी म्हाडाच्या समतानगर या विभागाच्या पुनर्विकासाचे काम करत आहे. समतानगर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीज युनियन लिमिटेड ही एक संस्था तयार करण्यात आली असून त्याची दर पाच वर्षांनी निवडणूक घेण्यात येते. हेगडे यांच्या कंपनीचा सदर सोसायटी सोबत पुनर्विकासासाठी २००७ मध्ये करार झाला आहे. ज्यात आरोपी मासावकर हा सभासद होता मात्र २००८ मध्ये तो सभासद नव्हता. त्यानुसार २०१० मध्ये सदर सोसायटीत पुनर्विकासाच्या कामासाठी जाणाऱ्या हेगडेंच्या कंपनी कर्मचाऱ्यांना त्याने धमकवायला सुरुवात केली. तो त्यांच्याकडून पैशाची मागणी करायचा त्यामुळे २०१२ मध्ये कंपनीने समता नगर पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे लेखी तक्रार दिली.

त्यावेळी मासवकरने माफी मागितली आणि तो शांत झाला. मात्र गेल्या दीड वर्षापासून कंपनीचे प्रोजेक्ट प्रमुख मुकेश वाघेला यांना भेटून त्यांच्याकडून पाच ते सात वेळा रोख रक्कम घेऊन गेला. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात त्याने वाघेलाकडे १ कोटींची मागणी केली जे देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर अशोक सावंत को जैसे रोड पे ठोक दिया था वैसे तुमको भी रास्ते पे ठोक दूंगा, मेरे बच्चे बाहर आ गये है असे म्हणाला. मात्र वाघेलानी तक्रार करेन असे सांगितल्यावर तो तिथून शिवीगाळ करत निघून गेला. या दरम्यान त्यांनी ५ हजार रुपये कंपनीकडून घेत नंतर पुन्हा मला एक दुकान द्या किंवा एक करोड रुपये द्या असे सांगितले. ज्याला विरोध केल्यावर त्याने पुन्हा मेरा अंडरवर्ल्ड के भाई लोगो के साथ संबंध है, मुझे पैसा नही दिया तो तुम्हारी अशोक सावंत जैसी हालत कर दुंगा अशी दमदाटी केली.

हे धमकी सत्र सुरू असताना तो कंपनी विषयी बदनामीकारक व्हॉइस मेसेज पाठवू लागला. प्रोजेक्ट बंद करवा दूंगा असेही सांगू लागला. अखेर वाघेला यांनी याप्रकरणी मासावकर विरोधात समतानगर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३८६ तसेच ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Give one crore, otherwise I will beat you like Ashok Sawant Threatened to kill the builder demanding ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.