महापालिका निवडणुकीत दुसरा धक्का द्या, शिंदे यांचे पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:48 IST2025-02-19T05:47:41+5:302025-02-19T05:48:39+5:30

विधानसभेत ज्या पद्धतीने विरोधकांना पहिला झटका आपण दिला, त्याप्रमाणे आता दुसरा जोरदार झटका महापालिकेत देण्यासाठी तयार राहा.

Give a second push in the municipal elections, Shinde appeals to office bearers at the gathering | महापालिका निवडणुकीत दुसरा धक्का द्या, शिंदे यांचे पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

महापालिका निवडणुकीत दुसरा धक्का द्या, शिंदे यांचे पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

मुंबई :  विधानसभेत ज्या पद्धतीने विरोधकांना पहिला झटका आपण दिला, त्याप्रमाणे आता दुसरा जोरदार झटका महापालिकेत देण्यासाठी तयार राहा. कार्यकर्त्यांचे आणि संघटनेचे बळ वाढवा. घराघरांत आणि मनामनांत शिवसेना पोहोचली पाहिजे. प्रत्येक वॉर्डातून शिवसैनिकांची फौज तयार करा आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वरळी येथे पदाधिकारी बैठकीत केले.

या मेळाव्यात मुंबईतील आमदार, खासदार यांच्यासह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी खा. रवींद्र वायकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांची भाषणे झाली. मुंबई महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून लुटण्यात आले. मात्र, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील काँक्रीट रस्ते करण्यावर भर दिला. त्यापूर्वी साडेतीन हजार कोटी रुपये केवळ खड्ड्यात घातले गेले होते. आता महापालिकेच्या वतीने सर्व रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जाणार आहेत. तर महापालिका कर्मचारी प्रत्येकाच्या घरी येऊन आरोग्य अभियान राबवणार आहे. कोस्टल रोड शेजारी ३०० एकर उद्यान तयार करण्यात येत आहे. मुंबईत मोठे जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेतले आहेत, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पवारांनी प्रशंसा केल्यामुळे पोटदुखी’

शरद पवारांनी आपल्याविषयी चांगले उद्गार काढल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे, असा टोलाही शिंदेंनी लगावला. आता आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला सोन्याचे दिवस दाखवायचे आहेत. 

मुंबईतील सर्व रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प आपण पूर्णत्वास नेणार आहोत. बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणणार आहोत, असेही ते म्हणाले.

Web Title: Give a second push in the municipal elections, Shinde appeals to office bearers at the gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.