हरकतीसाठी २१ दिवस द्या; अन्यथा, निवडणुका रद्द करा, ठाकरे बंधुंची निवडणूक आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 06:51 IST2025-11-25T06:51:14+5:302025-11-25T06:51:35+5:30
Local Body Election 2025: मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हरकतीसाठी २१ दिवस द्या; अन्यथा, निवडणुका रद्द करा, ठाकरे बंधुंची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई - मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. उद्धवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळाने सोमवारी यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा करत मागण्यांचे पत्रही त्यांना दिले. आदित्य ठाकरे, ॲड. अनिल परब, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
एक व्यक्ती दोन्हीकडे मतदान करू शकते
दुबार मतदारांसाठी परिशिष्ट ब मध्ये दिलेल्या हमीपत्रानुसार एका मतदार एकाच दिवशी एकाच क्षेत्रात मतदान करू शकतो. परंतु, एखादा मतदार हमीपत्र देऊन एका दिवशी जिल्हा परिषदेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पालिका निवडणुकीत मतदान करू शकतो, असे सांगत आयोगाने हे परिशिष्ट बदलावे, अशी मागणीही केली असल्याचे आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
विरोधकांच्या प्रभागातील काही इमारती दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आल्या आहेत. हा घोळ मुंबईपुरता नसून ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिका क्षेत्रातही असल्याचे ठाकरे म्हणाले.