Join us

हजारोंच्या उपस्थितीत होणारे लग्न समारंभ थांबवण्याची गरज, गिरीश महाजन यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:05 IST

मोठ्या प्रमाणावर लग्ने होत आहेत. त्या ठिकाणी हजारो लोक उपस्थित राहात आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे

मुंबई : ग्र्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लग्ने होत आहेत. त्या ठिकाणी हजारो लोक उपस्थित राहात आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आधी ही लग्ने थांबवा नाहीतर, अशा लग्न समारंभात आलेला एखादा रुग्णदेखील अत्यंत भयावह स्थिती निर्माण करेल, अशी भीती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, एका लग्न समारंभात मी आयोजकांनावर ओरडलोदेखील. लग्न समारंभात लहान मुले असतात. ज्या मंडपात हजार लोकांच्या बसण्याची जागा आहे तेथे दोन हजार लोक बसलेले दिसत आहेत, जेवणाच्या ठिकाणीदेखील तशीच गर्दी आहे, माझ्याकडे आजमितीला ७० ते ८० लग्नपत्रिका आल्या आहेत. सरकार चांगले काम करत आहे, आम्ही शाळा, महाविद्यालये बंद ठेवत आहोत, दारुची दुकाने, मॉल बंद करत आहोत. पण आता यासोबतच लग्न समारंभ तातडीने बंद करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या पाहिजेत, असे आपण स्वत: मुख्य सचिव अजोय मेहता यांना केल्या; मात्र अद्याप कोणत्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना गेल्याचे दिसत नाही. काहीही करा, पण हे असे समारंभ थांबवा. लग्नासाठी पुण्यामुंबईहून लोक राज्यभर फिरताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील लोक आज हा आजार जर हसण्यावर नेणार असतील तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीतीही महाजन यांनी व्यक्त केली.काहीही झाले तरी गर्दी आवरणे जास्त महत्त्वाचेविधानसभेत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती, असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जर लोक ऐकतच नसतील तर नाइलाजाने राज्यभर संचारबंदी जाहीर करण्यासही मागे पाहू नका, पण गर्दी आवरा, असे आवाहनही महाजन यांनी केले आहे. 

टॅग्स :गिरीश महाजनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस