घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला अखेर अटक; सात महिन्यांनी अर्शद खान जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:40 IST2024-12-31T10:40:06+5:302024-12-31T10:40:53+5:30
या प्रकरणात आतापर्यंत इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालक जान्हवी मराठे, फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक करण्यात आली आहे...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला अखेर अटक; सात महिन्यांनी अर्शद खान जाळ्यात
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खान अखेर सात महिन्यांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. लखनौ येथून त्याला अटक केली आहे. खानच्या अटकेने या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालक जान्हवी मराठे, फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक करण्यात आली आहे. होर्डिंगच्या परवानगीनंतर पोलिस अधिकारी कैसर खालीद यांच्या सांगण्यावरून जान्हवी मराठेने इगोच्या खात्यातून अर्शद खानला काही धनादेश दिल्याचे भिंडेने गुन्हे शाखेला सांगितले होते.
१०२ जणांचे जबाब
आतापर्यंत १०२ जणांचे जबाब नोंदवले आहेत. दोन महापालिका कर्मचारी, लोहमार्ग पोलिस दलाचे आजी व माजी अधिकारी असे मिळून सहा जण, कच्चा माल पुरवणाऱ्या ५ व्यक्तींच्या जबाबाचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक अशा ९० जणांचे जबाबही नोंदवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या ३२९९ पानांच्या आरोपपत्रामध्ये निलंबित अधिकारी कैसर खालीद यांच्यासह दोन भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या जबाबाचाही समावेश आहे.