४६ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनानिमित्त गवाणकर, मोने आज एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 09:44 AM2023-12-02T09:44:23+5:302023-12-02T09:45:35+5:30

मुंबई मराठी साहित्य संघ आणि नॅशनल लायब्ररी यांच्यावतीने शनिवार २ डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी सभागृहात पार पडणार आहे.

Gavankar, Mone on the same platform today in mumbai | ४६ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनानिमित्त गवाणकर, मोने आज एकाच व्यासपीठावर

४६ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनानिमित्त गवाणकर, मोने आज एकाच व्यासपीठावर

मुंबई : ४६वे महानगर मराठी साहित्य संमेलन वांद्रे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे एक दिवसीय संमेलन असणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि नॅशनल लायब्ररी यांच्यावतीने शनिवार २ डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी सभागृहात पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचा प्रारंभ 
सकाळी ९:३० वाजता ग्रंथप्रदर्शनाने होईल.

संमेलन उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संजय मोने असून, स्वागताध्यक्ष आमदार आशिष शेलार आहेत. यावेळी अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात येईल. या संमेलनात विवेक कुडू यांना कथाकार शांताराम पुरस्कार, विनायक गोखले यांना संस्था कार्यकर्ता पुरस्कार आणि डॉ. लीला गोविलकर यांना कै. वि. स. पागे स्मृत्यर्थ अध्यात्मिक वाड्:मय पुरस्कार देण्यात येणार आहे.

चिन्मयी सुमीत यांची मुलाखत:

या संमेलनात प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांची मराठी शाळांच्या संदर्भात छाया पिंगे मुलाखत घेणार आहेत. ‘आजची समाज माध्यमं : शाप की वरदान’ या विषयावर परिसंवाद ठेवला असून, त्यात प्रा. अविनाश कोल्हे, सौरभ करंदीकर, आशुतोष उकिडवे आणि यश कासारे यांचा सहभाग आहे. तरुणांना व्यक्त होण्यासाठी खास दहा तरुण कवींचे कवी संमेलन आयोजित केले आहे. प्रसिद्ध कवी सायमन मार्टिन कवींना मार्गदर्शन करतील. संमेलनाची सांगता डॉ. राम पंडित आणि सहकारी यांच्या ’आठवणीची शब्दफुले’ या सांगितीक कार्यक्रमाने होईल. या एक दिवसीय संमेलनासाठी निःशुल्क प्रवेश असून, साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी केले आहे.

Web Title: Gavankar, Mone on the same platform today in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.