गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:59 IST2025-12-03T12:57:24+5:302025-12-03T12:59:24+5:30
Anant Garje Wife News: गौरीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले होते. गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनंतने भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला होता.

गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणात गर्जे याच्या माजी प्रेयसीचा वरळी पोलिसांनी जबाब नोंदविला. २०२२ पासून अनंतसोबत संबंध नसल्याचे तिने म्हटले आहे. अनंतला मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तसेच घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही हाती लागल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
गौरीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गर्जे याला अटक केली आहे. गौरीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनंतने भिंतीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आले.
याबाबतचे सीसीटीव्हीदेखील हाती लागल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या त्यालाच जाळीमधून आतमध्ये प्रवेश करता येतो का? याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगण्यात आले होते.
वरळी पोलिसांनी गर्जे याच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे. अनंतसोबत २०२२ पासून कोणताही संबंध नव्हता. गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत कल्पना नाही, असा जबाब महिलेने पोलिस चौकशीत दिला.
पोलिसांकडून अनंत गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणार
अनंतच्या शरीरावर २८ जखमा आहेत. गौरी आणि अनंत यांच्यात झटापट झाल्याच्या जखमा असल्याचे पोलिसांकडून कोर्टात सांगितले. अनंतची पॉलिग्राफ टेस्ट करीत मानसशास्त्रीय तपास केला जाणार आहे, तसेच तज्ज्ञांच्या माध्यमातून तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आवश्यक असल्यास पोलिस त्याची पुन्हा कोठडी घेऊ शकतात.