गॅसटंचाई आणखी तीव्र; गॅस सिलिंडरअभावी शहरातील प्रमुख भागातील अनेक हॉटेल्स बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:09 IST2026-03-13T08:08:36+5:302026-03-13T08:09:03+5:30
मुंबईतील गॅस टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. गॅस सिलिंडरअभावी गुरुवारी शहरातील प्रमुख भागातील अनेक हॉटेल्स बंद होती.

गॅसटंचाई आणखी तीव्र; गॅस सिलिंडरअभावी शहरातील प्रमुख भागातील अनेक हॉटेल्स बंद!
मुंबई : मुंबईतील गॅस टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. गॅस सिलिंडरअभावी गुरुवारी शहरातील प्रमुख भागातील अनेक हॉटेल्स बंद होती. त्यातून या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी जाणाऱ्यांना बंद असलेले शटर पाहून परतावे लागत होते.
लोअर परळ, करी रोड भागात मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. या कार्यालयातील अनेक कर्मचारी दुपारी जेवणासाठी या भागातील खानावळी आणि हॉटेल्सचा आधार घेतात. मात्र या हॉटेल्समधील गॅस संपल्याने गुरुवारी अनेक हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती.
करी रोड येथील एका हॉटेलचे व्यवस्थापक सचिन शेटे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक असल्याचे सांगितले. त्यानंतर ओव्हनमध्ये केवळ पिझ्झा तयार करता येईल. तेवढाच पदार्थ विक्रीसाठी ठेवणार आहे. बाजारात इंडक्शन खरेदीसाठीही गेलो होतो. मात्र, तेथेही प्रचंड गर्दी होती. तसेच अनेक पदार्थ इंडक्शनवर तयार करणे शक्य नाहीत. त्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही, असेही शेटे म्हणाले.
घरगुती जेवणाची खानावळ चालविणारे रामचंद्र पाटील यांनीही गॅस जवळपास संपल्याचे नमूद केले. इंडक्शनवर स्वयंपाक करण्यासाठी दुप्पटीहून अधिक वेळ लागतो. त्यातून खानावळीत सर्व पदार्थ ठेवणे शक्य होणार नाही. आता इंडक्शनवर जेवढे पदार्थ तयार करणे शक्य होईल, तेवढे ठेऊन खानावळ सुरू ठेवणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील अनेक हॉटेल्समधील खाद्यपदार्थ कमी करून ते सुरू ठेवत आहेत. तर अनेक हॉटेल्स बंद झालेली आहेत. बहुतांश हॉटेल्स बंद झाली आहेत किंवा त्यांनी ऑपरेशन्स बंद केली आहेत.
प्रदीप शेट्टी, उपाध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)