Join us

गंगूबाई काठियावाडीची कोठी टेकूवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:20 IST

Gangubai Kathiawadi : राजकारणी, पोलिसांपाठोपाठ सध्या घरमालकाच्या लालसेपोटी टेकूवर उभ्या असलेल्या धोकादायक इमारतीत पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला जीव धोक्यात घालून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहे. 

मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘पॉलिटिशियन के लिये वोट है हम, पोलीस के लिये हफ्ते का नोट है हम’... गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग. मात्र, गंगूबाई ज्या इमारतीत राहत होती. या  इमारतीची अवस्थाही गंगूबाईच्या प्रसिद्ध डायलॉगसारखीच आहे. राजकारणी, पोलिसांपाठोपाठ सध्या घरमालकाच्या लालसेपोटी टेकूवर उभ्या असलेल्या धोकादायक इमारतीत  पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला जीव धोक्यात घालून वेश्याव्यवसाय करीत आहे. 

वयाच्या १६ व्या वर्षी गंगूबाईच्या वडिलांच्या अकाउंटंटशी प्रेम झालं. लग्न करून मुंबईत मोठमोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगूबाईला अवघ्या ५०० रुपयांत ज्या कोठीवर विकण्यात आले होते, तीच दारूवाला इमारत सध्या टेकूवर उभी आहे.  आजही खिडकीतून ग्राहकांची वाट बघणाऱ्या महिला नजरेत पडल्या. इमारतीच्या धोकादायक प्रवेशद्वारातून पहिल्या मजल्यावरील घरात जाताच चिंचोळ्या वाटेत गंगूबाईचा पुतळा आणि त्यावर प्रकाश टाकणाऱ्या रंगीबेरंगी लाईट दिसतात. त्याच्या दोन्ही बाजूला छोटे-छोटे ६ केबिन बनवून भाड्याने देण्यात आले आहेत. यामध्ये काही महिला जीव मुठीत धरून वेश्याव्यवसायचा व्यवसाय करीत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

घरमालक चांद मोहम्मद हबीब मिया हे येथील कारभार बघत असून, फक्त पैशांसाठी निर्धास्त असलेला मालक ७५०० ते १० हजार भाडे आकारत येथील रूम भाड्याने देत आहे. भाडेकरूकडून महिन्याला एकूण  ७५ हजार रुपये घरमालकाला दिले जात असल्याचेही स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले. टेकूवर उभ्या असलेल्या इमारतीच्या तळाशी हॉटेल, तसेच दुकाने आहेत. वरच्या मजल्यावर आतून चकाकी वाटत असली तरी खाली सुरू असलेल्या गळतीतून खरे वास्तव समोर येते.  तसेच खाली असलेल्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा सुरू असते. येथे काम करणारा कामगारदेखील तेथेच काम करून झोपतो. अशात इमारत कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती येथील कामगार व्यक्त करतात. दरम्यान, कामाठीपुऱ्यात अशा अनेक धोकादायक इमारती आहेत.इमारत एक, मालक अनेक...कामाठीपुरातील अनेक इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. पुनर्विकासाचा मुद्दा प्रलंबित असून, त्यासंबंधितचे विधेयक राष्ट्रपतींच्या सहीअभावी प्रलंबित आहे. इमारत एक असली तरी त्यातील खोल्यांचे मालक वेगवेगळे आहेत. त्यामुळे एकत्रित संवाद साधताना अडचण निर्माण होते. तेथील रहिवाशांना रोजगार, शिक्षणाच्या दृष्टीने दक्षिण मुंबईतच संक्रमण शिबिर हवे आहे. यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे. :  विनोद घोसाळकर- माजी सभापती, म्हाडाप्रशासन निष्पापांच्या मृत्यूच्या प्रतीक्षेतदारूवाला इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत वारंवार म्हाडा, पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रशासन आणखीन काही जणांच्या मृत्यूची वाट बघत असेल. त्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच संबंधित इमारतीच्या मजल्यावर तोडकी कारवाई करणे गरजेचे आहे. - विनोद अरगिले, उपविभाग अध्यक्ष (मनसे)कारवाई सुरूधोकादायक इमारतींना नोटिसा देऊन खाली करण्यात येत आहे. अनेक जण इमारत दुरुस्त करून त्यांच्या जबाबदारीने राहत असल्याचे सांगत आहे. मात्र, अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना तत्काळ खाली करण्याचे काम सुरू आहे. - अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, म्हाडाएक बाजू कोसळलेल्या इमारतीत २९ कुटुंबे...कामाठीपुरातील अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी सातवी गल्लीत असलेली चंदाबाई चाळीतील इमारत क्रमांक ६७,६९ मध्ये २९ कुटुंबे जीव मुठीत धरून राहतात. विशेष म्हणजेच नुकतेच इमारतीचा पुनर्विकास करून रहिवाशांना येथे राहण्यास दिले. मात्र, काही वर्षांत नवीन इमारतीची पडझड सुरू झाली. नुकतेच एका बाजूने इमारतीचा भाग कोसळला. त्यावर तात्पुरती मलमपट्टी लावली. त्यानंतर, पायऱ्यांचा भागदेखील कोसळण्याच्या स्थितीत असताना तेथील एक बाजू पाडून काम सुरू आहे. याच इमारतीत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. परिस्थितीअभावी दुसरीकडे राहणे शक्य नसल्याने याच धोकादायक इमारतीत रहिवासी दिवस काढत आहे. त्यात, आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तुटलेली ड्रेनेज लाईनमध्ये नागरिकांना वास्तव्य करावे लागत आहे. मात्र,  येथे लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याचे ५५ लक्ष्मी गणपत साळवे सांगतात.

टॅग्स :मुंबईम्हाडामनसेपोलिसवेश्याव्यवसाय