Jogeshwari Crime: राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतच सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली. पाच आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जोगेश्वरीत ११ दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. शाळा सुटल्यानंतर घरी आलेली १२ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील एका घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या घृणास्पद गुन्ह्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पाच संशयितांना अटक केली. आरोपी एअर कंडिशनिंग मेकॅनिक म्हणून काम करतात. दादर रेल्वे स्थानकाजवळ ही अल्पवयीन मुलगी भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. त्यांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने सगळा धक्कादायक प्रकार सांगितले. रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर आहेत. २४ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी शाळेतून उशीरा घरी आली होती. त्यामुळे तिचे काकाशी भांडण झालं होतं. त्याच रागातून मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती जोगेश्वरी स्थानकावर आली जिथे तिची एका मुलाशी भेट झाली जो तिच्यासोबत वांद्रे बँड स्टँडला गेला. त्यानंतर पीडितेला आणखी पाच तरुण भेटले जे तिला मरीन ड्राइव्ह आणि नंतर संजय नगर येथे घेऊन गेले. याच ठिकाणी आरोपींनी मुलीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, आरोपी कामावर गेले असताना मुलीने ते घर सोडलं आणि दादर स्टेशन गाठलं.
दुसरीकडे, मुलीच्या काकांनी जोगेश्वरीमध्ये तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. दादर स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी याची माहिती जोगेश्वरीतील पोलिसांना दिली तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आलं. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो ) कायदा अंतर्गत कलमाची वाढ केली. दरम्यान, पोलिसांनी जमाल, आफताब, महफुज, हसन आणि जाफर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.