Join us  

गणेशोत्सव मंडळांना अजूनही मंडपाच्या परवानग्या नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:58 AM

यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा या विवंचनेत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गणेशोत्सव अवघ्या 25 दिवसांवर आला असताना अजूनही अनेक गणेशोत्सव मंडळांना पालिका प्रशासन आणि अन्य खात्यांच्या मंडप उभारण्याच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा या विवंचनेत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ पुढच्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईत ठिकठिकाणी महाआरत्या करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

येत्या 22 ऑगस्टला साजरी होणारी बकरी ईद व दुसरीकडे मंडपाला परवानग्या मिळत नसल्यामुळे होणाऱ्या गणेश मंडळांच्या महाआरत्या यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुंबई पोलिसांची कसोटी लागणार आहे. गेल्या 8 ऑगस्टला बिर्ला भवन येथे झालेल्या गणेशोत्सव मंडळाच्या सभेला 405 मंडळे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर मंडप उभारायला पालिका प्रशासन आडमुठी भूमिका घेत असेल तर सरळ महाआरत्या सुरू करा आणि गेली अनेक वर्षे सुरू असलेला आपला गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा असे आदेश त्यांनी यावेळी दिले होते.

विलेपार्ले (पूर्व) शहाजी राजे मार्गावरील विलेपार्ले साम्राट गणेशोत्सव मंडळ यंदा आपले 49 वे वर्ष साजरे करत आहे. आमच्या मंडळाचा मंडप उभारण्यासाठी मंडळाने पालिका प्रशासन व आरटीओकडे अर्ज करून अनेक दिवस झाले आहेत. मात्र अजूनही आमच्या मंडळाला सदर परवानगी मिळालेली नाही. आमच्यासारखी अनेक गणेशोत्सव मंडळे आजही मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असून ती संभ्रमात आहेत. त्यामुळे लवकरच विभागप्रमुख व आमदार अँड.अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांच्या आदेशाने महाआरतीचे लोण संपूर्ण मुंबईत पसरेल असा ठोस इशारा या मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी लोकमतशी बोलताना दिला.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईशिवसेनाउद्धव ठाकरे