गणेशभक्तांना मिळणार फुकट प्रवासाचे सौख्य, कोकणवारीसाठी ६ रेल्वे गाड्या, ३३८ बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:10 IST2023-09-14T13:09:53+5:302023-09-14T13:10:20+5:30
Mumbai BJP: मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवानिमित्त याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा होईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६ रेल्वे गाड्या आणि ३३८ एसटी आणि खासगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत

गणेशभक्तांना मिळणार फुकट प्रवासाचे सौख्य, कोकणवारीसाठी ६ रेल्वे गाड्या, ३३८ बस
मुंबई - मुंबई भाजपातर्फेगणेशोत्सवानिमित्त याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा होईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६ रेल्वे गाड्या आणि ३३८ एसटी आणि खासगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी पत्र परिषदेत दिली.
मुंबई भाजपतर्फे १, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे १ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांच्यातर्फे २ (मोदी एक्स्प्रेस) अशा ४ रेल्वे गाड्या पाठविण्यात येतील. आणखी दोन गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. १५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मुंबई भाजपच्या वतीने यंदाही मुंबईचा मोरया या गणेशोत्सव स्पर्धा होणार आहे. यंदा तर २५०० हून अधिक गणेश मंडळे सहभागी होतील. उत्कृष्ट मूर्ती स्पर्धा, उत्कृष्ट सजावट / देखावा आणि उत्कृष्ट परिसर स्वच्छता या तीन गटात स्पर्धा होणार असून असून प्रत्येक गटात पहिले बक्षीस ३ लाखांचे आहे. प्रत्येक गटात दुसऱ्या क्रमांकासाठी १.५० लाख रु. तर तृतीयसाठी ७५ हजार रुपये बक्षीस असेल.
आरेमध्ये कृत्रिम तलाव करणार
आरेमधील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी असावी, असे आदेश काहींनी आणले आहेत. मात्र आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपण विनंती केली असून आरेमध्ये कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जन व्यवस्था करण्यात येईल आवश्यकता भासल्यास डीपीसी मधून निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.
चाकरमान्यांसाठी २५६ एसटी बस
मुंबई भाजपातर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी २५६ एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून काही नगरसेवकांनी आपापल्या विभागात खासगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहितीही शेलार यांनी दिली.