Join us

जुगारातील फोटो अन् दारूच्या ब्रँडने शिवसेना-भाजपात राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 08:24 IST

बावनकुळे, आदित्य ठाकरे यांचे फोटो व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कॅसिनोतला फोटो व आदित्य ठाकरे यांचा ग्लास हातात असलेला फोटो यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांचा नवा ट्रेंड राजकारणात बघायला मिळाला.राऊत यांनी सोमवारी सकाळीच बावनकुळे यांचा फोटो ट्विट केला. या फोटोत बावनकुळे कॅसिनोत बसल्याचे दिसत आहेत. त्यावरील मथळ्यात ‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करून पाहा ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है’ असे लिहिले. 

भाजपकडूनही आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करण्यात आला. यामध्ये आदित्य यांच्या हातात ग्लास दिसत आहे. मथळ्यात ‘आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की’, असा सवाल करून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राऊतांची मानसिकता विकृत झाली असून, हा राजकारणाची पातळी खालावणाराच प्रकार  आहे. ते किती हताश झाले आहेत हे त्यातून लक्षात येते. बावनकुळे हे कुटुंबासह त्या हॉटेलमध्ये थांबले होते. रेस्टॉरंट व कॅसिनो एकत्रितच आहे. राऊत यांनी जाणूनबुजून अर्धा फोटो ट्वीट केला, असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले.

बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडविले. त्याचे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आपल्याकडे आहेत.     - संजय राऊत, खासदार

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.    - चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष, भाजप 

टॅग्स :शिवसेनाभाजपासंजय राऊत