Join us  

चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 2:50 PM

निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

Rajesh Tope ( Marathi News ) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. "या सभागृहात चेहरे बघून निधी दिला जातो. विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर हे लोकशाहीला पोषक नाही," असा हल्लाबोल टोपे यांनी केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना राजेश टोपे म्हणाले की, "अर्थसंकल्पाच्या बाबतीत आर्थिक शिस्त पाळली गेली नाही, याची खंत आहे. २०२४-२५ वर्षासाठी अंतरीम बजेट ६ लाख ५७ हजार ७१९ कोटी २२ लाख रुपयांचे आहे व त्यात १.९५ टक्के म्हणजेच ९ हजार ७३४ कोटी रुपयांची महसुली तूट आहे. उत्पन्न वाढवण्याचे मार्ग कमी असल्याने कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलं आहे. आपल्यावर ६१ हजार ३६३ रुपये दरडोई कर्ज आहे. त्यामुळे हे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो," अशी टीका टोपे राजेश टोपेंनी केली आहे.

सरकारवर निशणा साधताना राजेश टोपे यांनी पुढे म्हटलं आहे की, "सामाजिक न्याय योजनांमध्ये कपात करण्यात आल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानसारख्या क्षेत्रावर, शेतीवर खर्च कमी झालेले आहे. वेतन निवृत्तीवेतन यामध्ये वाढ केल्याने महसुली तूट वाढत आहे. राज्यात गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करणे महत्वाचे आहे. अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा पाऊस आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे देताना अशी नीती केली पाहिजे की शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. कापसाचा, सोयाबीनचा खर्च वाढला पण त्याला भाव नाही. शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची नुकसान भरपाई कधी मिळेल हा प्रश्न आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या महाविद्यालयांसाठी काय तरतूद आहे? तिथले विद्यार्थी विना सुविधा पास होत असतील तर हे योग्य नाही. क्रीडा संकुलाची व्यवस्था होताना दिसत नाही. अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून त्यांच्या मागण्या मांडल्या. इमारती तयार नसल्याने मुलांना झाडाखाली बसावे लागते त्यांच्या मेंदूचा विकास होत असताना ही गोष्ट योग्य नाही. सरकारचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे."

दरम्यान, राजेश टोपे यांनी केलेल्या या टीकेला अर्थमंत्री अजित पवार काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :राजेश टोपेअजित पवारअर्थसंकल्प 2024महाराष्ट्र बजेट 2024राष्ट्रवादी काँग्रेस