'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:40 IST2025-05-31T10:40:35+5:302025-05-31T10:40:44+5:30

वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

Fund of Rs 272 crore approved for J J Superspecialty Hospital | 'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत

'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत

मुंबई : जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असून, येथील त्यातील सुपरस्पेशालिटी विभागासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने २७२ कोटी ५८ हजार २५० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पांतून उपलब्ध झाला आहे.

जे. जे. रुग्णालयाच्या परिसरातील बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम गेल्या काही वर्षापासून लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या रुग्णालयाच्या दोन विंगचे काम पूर्ण होणार होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते झाले नाही. २०२० मध्ये सुरू झालेले बांधकाम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.

या बैठकीत कंत्राटदाराकडून चारपैकी पहिल्या दोन विभागांचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सुविधांमुळे गरीबांना मोठा फायदा होणार असून महागातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आता येथे स्वस्तात उपलब्ध होतील.

डिसेंबरमध्ये पहिल्या दोन विंगचे काम पूर्ण होणार आहे. ते काम चालू असतानाच सुपरस्पेशालिटी विभागाच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल. हा सर्व निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध अनुदानातून देण्यात आला आहे - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

रुग्णालयात मिळतील अशा नवीन सुविधा 

दोन मजली तळघरासह तळमजला अधिक १० मजली इमारत. प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटांचा.

हृदयशस्त्रक्रिया, न्युरो सर्जरी, हेमॅटॉलॉजी, रुमॅटॉलॉजी, किडनी विकार, एंडोक्रायनोलॉजी, कॅन्सर शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी या विभागांसह अत्याधुनिक व्हीआयपी वॉर्ड आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स. 

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हजार खाटा वाढून संपूर्ण रुग्णलयातील खाटांची क्षमता २,३५० होईल.

विभागनिहाय खर्च - 

-७६,४०,१६,००० कार्डिओलॉजी 
- ६२,४२,१०,००० इंटरव्हेन्शल रेडिओलॉजी 
- ३१,३६,००,००० ऑनकॉलॉजी 
- ३०,८०,००,००० पेडियाट्रिक सर्जरी 
-२७,२६,५०,००० गॅस्ट्रो-इंटेन्सल सर्जरी 
-२६,२२,२०,००० एन्डोस्कोपी 
-१७,५३,६२,२५० नेफ्रोलॉजी
 

Web Title: Fund of Rs 272 crore approved for J J Superspecialty Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.