Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली ते गल्लीपर्यंत हवे ‘डबल इंजिन’च; पंतप्रधान मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 06:50 IST

शिंदेंच्या ‘ट्रिपल इंजिन’ची साथ, फडणवीसांचीही साद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप असो वा एनडीए, आम्ही राजकीय स्वार्थासाठी विकासात राजकारण करत नाही, असे विरोधकांना सुनावतानाच  विकासाचा बरोबर ताळमेळ बसवायचा असेल तर दिल्लीपासून मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत ‘डबल इंजिन’ सरकार असायला हवे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिकेतील भाजप-शिंदेसेनेच्या प्रचाराचा बिगूल गुरुवारी फुंकला.

मुंबईतील ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बीकेसी मैदानावर आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. केंद्र, राज्यात एकाच पक्षाचे सरकार जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते महापालिकेतही जरुरी आहे, यावर मोदी यांनी भर दिला. 

गतिमान विकासासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत ‘डबल इंजिन’चे सरकार हवे या मोदी यांच्या वक्तव्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता मुंबई महापालिका असे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आणण्याचा निर्धार बोलून दाखविला. मोदींच्या आशीर्वादाने सुरू झालेला विकासाचा झंझावात आता मुंबई महापालिकेतही येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना साद दिली.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, खा. राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आदी उपस्थित होते.

भाषणाची मराठीतून सुरुवात

  • ‘मुंबईतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार’ अशी भाषणाची मराठीतून सुरुवात मोदी यांनी केली. २५ मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, मधल्या काळात डबल इंजिन सरकार राज्यात नव्हते.
  • त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले. शिंदे-फडणवीसांचं ‘डबल इंजिन’ सरकार महाराष्ट्राला मिळाल्याने विकासाला गती आली आहे. स्वराज्य आणि सुराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. शिंदे-फडणवीस जोडी महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेईल.

 

हिंदी भाषिक मतदारांना जवळ केले!

मुंबईतील फेरीवाले, छोटेछोटे व्यावसायिक बव्हंशी हिंदी भाषिक आहेत. मोदी यांनी या निमित्ताने हिंदी भाषिक मतदारांना कुरवाळले. ज्यांना तुम्ही घालूनपाडून बोलायचे, हिणवायचे त्या फेरीवाल्यांनी गेल्याकाळात ५० हजार कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले. स्वनिधी योजना ही स्वाभिमानाची जडीबुटी आहे. तुम्ही दहा पाऊले चला, मी अकरा पाऊले चालेन असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :नरेंद्र मोदीएकनाथ शिंदे