Join us  

थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 4:36 PM

भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे.

मुंबई - भाजपानं आज ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन पुकारलं असून, मुंबईभाजपा कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या या आंदोलनावर महाविकास आघाडी सरकारकडून टीका होत आहे. पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही भाजपाच्या आंदोलनावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आता, आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटला उत्तर दिलंय.  

भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनावर आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टीका केली. सत्तेच्या राजकारणासाठी चाललेलं हे आंदोलन अत्यंत लाजीरवाणं आहे. कोरोनाला विसरुन राजकारण प्रिय असल्याचं भाजपाने दाखवून दिलंय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एक फोटो शेअर केला आहे. लहान मुलांना उन्हात उभं करुन त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. या मुलांच्या तोंडावर नीट मास्कही झाकण्यात आलेलं दिसत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लहान मुलांना घरात आणि सुरक्षित ठेवणे गरजेचं असताना, हे काय चाललंय? कोरोना को भुल गये, पॉलिटीक्स प्यारा है... असे आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय. तसेच जगभरातील नागरिक सर्वकाही विसरुन कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढत आहे. मात्र, एका राजकीय पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी एक खालच्या पातळीचा विश्वविक्रमच बनवला आहे. सध्या राजकारणात गुंतलेला तो जगातील एकमेव पक्ष असून भीती, तीरस्कार आणि विभाजनाची रणनिती या पक्षाकडून सुरु असल्याचं दिसत आहे, असेही आदित्य यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंच्या ट्विटला नितेश राणेंनी थेट उत्तर दिलंय. 

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांमुळे... महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही न्यूयॉर्कच्या बरोबरीने आहे. जर थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा आणि आम्हाला या महामारीच्या संकटापासून वाचवा, असे राणेंनी म्हटलंय. तसेच, आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या दुसऱ्या फोटोवरुनही नितेश राणेंनी आदित्य यांनाच लक्ष्य केलंय. जर, सत्तेची लालसा मुलाला पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न कुठलेही कष्ट न घेता पूर्ण करु शकते. तर, सर्वकाही शक्य आहे मित्रा.. असे नितेश राणेंनी म्हटलं आहे.  

हेही वाचा

भाजपा नेते ठाकरे सरकारच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस, खडसे, राणे दिसले आंदोलनात

सत्तेची लालसाच नेत्यांना 'हे' करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण

टॅग्स :नीतेश राणे आदित्य ठाकरेमुंबईकोरोना वायरस बातम्याभाजपा